Sindhudurg Election Strategy : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नगर परिषद, नगर पंचायती आणि महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, त्याआधीच राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार सुधीर सावंत आणि मनसेचे उमेदवार शांताराम साद्ये यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला. याआधी महापालिका निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला झाला होता. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असतानाच, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही असाच प्रकार घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा हा तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी ठरला आहे. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम राहिल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.