नवी दिल्ली: अमेरिकेच्या H-1B व्हिसा प्रक्रियेत होणारा विलंब आणि मुलाखती रद्द केल्या जात असल्याच्या प्रकरणावर भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, या अनिश्चिततेमुळे शेकडो भारतीय नागरिक मायदेशात अडकले असून, त्यांच्या नोकऱ्या, मुलाखती आणि मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, डिसेंबरच्या मध्यापासून नियोजित असलेल्या H-1B व्हिसा मुलाखती अचानक मे २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया प्रोफाइल आणि ऑनलाइन उपक्रमांच्या अतिरिक्त तपासणीमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक भारतीय व्यावसायिक अमेरिकेला परत जाऊ शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबांवर होत आहे. “व्हिसा हा संबंधित देशाचा सार्वभौम अधिकार असला तरी, मानवी दृष्टिकोनातून आम्ही हा विषय वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली अशा दोन्ही स्तरावर अमेरिकन प्रशासनाकडे लावून धरला आहे,” असे जयस्वाल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताचे लक्ष साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्त्यांनी इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले. कॅनडात झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत, सरकार स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगण्यात आले. सिडनी येथील बॉन्डी बीचवरील घटनेवर भारत लक्ष ठेवून असून संबंधित परदेशी यंत्रणांच्या संपर्कात आहे. तसेच परदेशात लपलेल्या आर्थिक आणि इतर गुन्हेगारांना भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना भारतीय न्यायालयासमोर उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला की, व्हिसा असो वा सुरक्षा, जगभरातील भारतीय नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.