राष्ट्रवादीत “निष्ठावंत – आयात’ भडका उडण्याची शक्‍यता

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसला पिंपरी- चिंचवड शहरासह राज्यभरात खिंडार पडले असतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीवरून अफवांचे पीक निर्माण झाले आहे. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आणि अडचणीच्या काळातही पक्ष न सोडणाऱ्यांनाच निवडणुकीची उमेदवारी मिळेल की आयात व्यक्‍तीला तिकीट मिळेल यावर तर्क-वितर्काला उधाण आले आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून युवा नेते शेखर ओव्हाळ यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित झाले असल्यामुळे कार्यकर्तेही जोमाने तयारीला लागले आहेत. खुद्द ओव्हाळ यांना पक्षाकडून तयारीला लागण्याचे संकेत मिळाले असल्यामुळे त्यांनी देखील मतदारसंघात विविध कामांचा धडाका सुरु केला आहे. अशा तयारीच्या काळात अचानक डॉ. उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारीची ऑफर दिल्याच्या वृत्ताने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या बातमीमुळे पक्षात पुन्हा “निष्ठावंत-आयात वाद’ सुरू होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राज्यभर फूट पडली असून भले-भले दिग्गज दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला समजला जात होता. या बालेकिल्ल्यात पक्षानेही अनेकांना पदे देऊन मोठे केले. मात्र, सतत सत्तेत राहण्याची चटक लागलेल्यांना सत्ताधारी पक्षात स्थलांतर करणे गैर वाटले नाही. अनेकांनी पक्षांतर केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता निवडक निष्ठावंतांची फळी उरली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, पक्षाशी निष्ठा राखणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची गरज आहे. त्यानुसार पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु असून ओव्हाळ यांना “कामाला लागा’ असे संकेतही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. पिंपरी मतदार संघातील प्रबळ दावेदार असलेल्या शेखर ओव्हाळ यांचे उमदे नेतृत्व पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना आपलेसे वाटत असून उत्साह भरत आहे. गेल्या निवडणुकीत शहरातील सर्व जागांवर दारुण पराभव अनुभवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विजयाची चिन्हे दिसू लागत असतानाच संभ्रमाचे वातावरण तयार करण्यात आले.

ओव्हाळ यांची काम करण्याची पद्धत, पक्ष संघटनेसाठी केलेले काम, सर्वपक्षीय नगरसेवकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, विविध सामाजिक कार्य, वंचितांचे, उपेक्षितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केलेली धडपड, नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीत त्यांनी केलेले मदतकार्य व आरोग्य शिबीर या सर्व पार्श्‍वभूमीवर शेखर ओव्हाळ यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतील अनेक निष्ठावंत आग्रही आहेत. मात्र, पिंपरीतून डॉ. उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारी देण्याची चर्चा पक्षाच्याच काही हितशत्रूंनी सुरु केल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शेखर ओव्हाळांशी संपर्क साधले असता ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता असून माझे काम मतदारसंघातील लोकांना सर्वश्रुत आहे. मला पक्षातील ज्येष्ठांनी कामाला लागण्याचे संकेत दिले असून इतर आयात उमेदवाराला तिकीट मिळेल, अशा अफवांवर माझा अजिबात विश्‍वास नाही. पक्षाच्या सूचनेनुसारच माझे काम सुरु असून, मला संधी दिल्यास मी निश्‍चितच विजयी होणार याची मला खात्री आहे.

…तर राष्ट्रवादीत पुन्हा फूट?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज पक्षांतर करीत असताना पिंपरीतही उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शेखर ओव्हाळ हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जातात. निष्ठावंतांना डावलून आयत्यावेळी अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास पक्षात फूट पडेल आणि ऐन निवडणुकीआधी पक्षाची आणखी पडझड होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.