कर्जत- जामखेडला हक्काचे पाणी मिळावे : पवार

कर्जत – कर्जत- जामखेड तालुक्‍यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पध्दतीने पाणीवाटप झाले पाहिजे, अशी मागणी युवा नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली.

यासंदर्भात रोहित पवार यांनी पुण्यातील सिंचन भवन येथे पंचायत समितीचे सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही.जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते व कुकडी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता एस.टी. धुमाळ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी पाणी वाटपाची मागणी केली.

या बैठकीसंदर्भात पवार म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्‍यातील 52 गावे डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. याचबरोबर भोसे खिंड बोगद्यातून पावसाळ्यात 1.2 टिएमसी अतिरिक्त पाणी सीना धरणात सोडले जाते.

त्यामुळे सीना धरणाच्या लाभक्षेत्रातील 40 गावांचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा व चाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली. परंतू गेल्या काही वर्षांपासून यावर्षीही बहुतेक भाग दुष्काळात होरपळत असून शेतीवर गंभीर दुष्काळाचे सावट आहे. त्यातच कुकडी डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांसह शेवटच्या भागातील गावांना सिंचनाचे पाणी वितरिकांमधून योग्य त्या दाबाने व पुरेसे मिळत नाही.

वितरिकांची दुरुस्ती व देखभाल झालेली नसल्याने पाणी पुरेसे पोचत नसून उभी पिके ऐन पावसाळ्यात जळून चालली आहेत. पाणी योग्य त्या दाबाने व हक्काचे पुरेसे पाणी समन्यायी पध्दतीने शेतीपर्यंत पोचविण्यासाठी व वितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्याने तत्परतेने पावले उचलावीत. जामखेडमधील जवळा, अघी, चौंडी, कर्जतमधील दिघी, चापडगाव, निमगाव डाकु ही गावे शेवटच्या भागात येतात, तेथेही हक्काचे पाणी पुरेसे पोचले पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here