ना. अतुल भोसले : आठ कोटींच्या कामांना आज सुरुवात
कराड – कराड तालुक्यातील पूरबाधित पूल व रस्त्यांसाठी 77 कोटी 83 लाख रुपये निधीची मागणी केली असून त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये तत्काळ दुरूस्तीसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले असून उद्यापासून या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भोसले म्हणाले, पुरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अडीच एकरापर्यंत कर्जमाफी व सोसायटीचे कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तिप्पट नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. कराड तालुक्यातही रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे.
रेठरे बुद्रुक येथील पुलाचे बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून सध्या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी 36 कोटी 62 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पूरबाधित जिल्हा मार्गांच्या दुरुस्तीसाठी 38 कोटी 60 लाख रुपये मागितले आहेत. कराड येथील वाढीव पूर संरक्षण भिंत, रेठरे बुद्रुक, खुबी, कार्वे, कोडोली, दुशेरे व पोतले येथे छोट्या पूर संरक्षण भिंतीबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनाची लवकरच बैठक घेणार असून यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. पाटण कॉलनीतील पूरबाधित घरांसाठी शासन मदत करणार आहे.