मेहरबानी करा आणि रुग्णवाहिका द्या!

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
नागरिकांची मागणी : आरोग्य केंद्रांतील बहुतांशी रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर

पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील उपकेंद्रांमध्ये डॉक्‍टरांची नियुक्‍ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना प्रत्येकवेळी औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागणार नाही. आता डॉक्‍टर मिळाले; परंतु मागील अनेक वर्षांपासून नवीन रुग्णवाहिका मिळण्याबाबत शासनदरबारी असलेला प्रस्ताव अजूनही धूळखात पडून आहे. त्यामुळे मेहरबानी करा आणि प्रस्तावावरील धूळ झटकून रुग्णवाहिका द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएससी) आहेत. तर 500 हून अधिक उपकेंद्रे आहेत. उपकेंद्रांमध्ये डॉक्‍टर नसल्यामुळे किरकोळ आजारासाठी नागरिकांना पायपीट करून आरोग्यकेंद्रांमध्ये यावे लागत होते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून उपकेंद्रांमध्ये डॉक्‍टर नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत 36 आरोग्य केंद्रांना वैद्यकीय अधिकारी देण्यात आले.

दरम्यान, उपकेंद्रांना डॉक्‍टर मिळतात ही आनंदाची बाब आहे ; परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र, या केंद्रांतील बहुतांश रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असून काही रुग्णवाहिकांची “व्हॅलीडीटी’ संपलेली आहे. उरल्या-सुरल्या रुग्णवाहिका वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णाला उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून जिल्हा रुग्णालयात दाखल करताना डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका चालकांची दमछाक होते.

प्रस्ताव धूळखात

जिल्ह्यातील 11 ठिकाणांच्या रुग्णवाहिका या दुरुस्तच होऊ शकत नसल्यामुळे त्याठिकाणी नवीन रुग्णवाहिका मिळाव्यात, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मुंबई येथील आरोग्य सेवा उपसंचालक आणि परिवहन विभागाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांना पाठविण्यात आला होता. डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2017 मध्ये याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.