Top 15 News: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणी ; SIR वादावर आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आणि ‘विजयवर प्रेम करणं वाईट कधीपासून झालं?’, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News:

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणी;
१८२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार!
Top 15 News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २३ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांतील निकालांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के, तर पुणे शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के मतदान झाले होते.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला;
बंडखोरीमुळे निकालाची उत्सुकता वाढली!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. २३ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील निकालांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी, अपक्ष उमेदवार आणि मित्रपक्षांतील लढतींमुळे मतविभाजनाची शक्यता आहे. त्यामुळे या निकालांतून दोन्ही आघाड्यांची संघटनात्मक ताकद आणि आगामी राजकीय समीकरणांचे संकेत मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात २ नवीन वन्यजीव अभयारण्ये;
७ जिल्ह्यांतील १४ संवर्धन क्षेत्रांना मंजुरी
महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत दोन नवीन वन्यजीव अभयारण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. गडचिरोलीतील रानम्हशींसाठी प्रसिद्ध कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांतील १४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मंजुरी मिळाली. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करणे यावरही बैठकीत चर्चा झाली.
बारावीच्या १८,५३४ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!
ऑनलाइन नोंदणीअभावी परीक्षा अर्जात अडथळा
महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेपूर्वी १८ हजार ५३४ विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अकरावीत ऑनलाइनऐवजी ऑफलाइन प्रवेश दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची UDISE+ प्रणालीमध्ये नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील आठ विभागांमधील १,२१८ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. मुंबई विभागात सर्वाधिक ६,४७८ विद्यार्थी बाधित आहेत. दोन वर्षे अभ्यास करूनही प्रशासकीय त्रुटींमुळे परीक्षा अर्ज भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट;
माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची होणार चौकशी Top 15 News:
ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सात वेळा, ५० तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी दोघांवर आरोप केले असून, पत्रकार परिषदेत काही व्हिडिओंचे पुरावेही सादर केल्याचा दावा केला. दरम्यान, ठाण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा शिंदेंकडून आढावा;
चारा, पाणी, टँकर व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरी आणि नाशिक तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. चारा, पाणी आणि टँकर व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. संकटातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर शिंदे यांनी टीका केली. मोदी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी बोलणे दुर्दैवी असल्याचे सांगत, १४० कोटी जनता पंतप्रधानांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.
भीमाशंकरमधील वृक्षतोडीला ओमराजे निंबाळकरांचा विरोध;
तातडीने वृक्षतोड थांबवण्याची मागणी
भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोध दर्शवला आहे. वृक्षतोड तातडीने थांबवून सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. एखाद्या प्रकल्पासाठी वृक्षतोड अपरिहार्य असल्यास तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात १०० झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. निसर्गाची हानी आणि बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका लक्षात घेता वृक्षतोडीबाबत गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
खरगे यांनी राजकीय मर्यादा पाळाव्यात
मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा खरगेंवर निशाणा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत वडिलांबाबतच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी टीका केली आहे. खरगे यांनी ज्येष्ठांचा सन्मान आणि राजकीय मर्यादा पाळाव्यात, असं त्या म्हणाल्या. २०१४ पासून काँग्रेसची राजकीय घसरण सुरू असल्याचा दावाही राणा यांनी केला. मोदींना देशातील जनतेने निवडून दिल्याचं भान काँग्रेसने ठेवावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
१७ वर्षे रुग्णसेवा, वेतन फक्त ७,५०० रुपये;
मेस कामगारांचे ठिय्या आंदोलन
अमरावतीतील तीन सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या १७ वर्षांपासून रुग्णांसाठी जेवण बनवणाऱ्या मेस कामगारांना दरमहा केवळ ७,५०० रुपये वेतन मिळत असल्याचा आरोप आहे. शासनाच्या नियमानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी प्रहार सामाजिक जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
खरगेंच्या विधानाविरोधात भाजपचे दादरमध्ये आंदोलन;
खरगेंच्या चपला मारून निषेध Top 15 News:
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कथित वादग्रस्त विधानाविरोधात भाजपने मुंबईतील दादर येथे आंदोलन केले. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली वसंत स्मृती कार्यालयाबाहेर हे आंदोलन झाले. यावेळी खर्गे यांच्या फोटोला चपला मारून, फोटो जाळून आणि पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला. तसेच राहुल गांधी यांच्या फोटोला आग लावण्यात आली. आंदोलनादरम्यान खर्गे यांच्याविरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
SIR वादावर आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र;
ज्ञानेश कुमारांना क्लीन चिट?
SIR प्रक्रियेवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप आयोगाने फेटाळला. SIR संदर्भातील तीनही आदेश सर्व आयुक्तांच्या संमतीने जारी केल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच फॉर्म ६ मध्ये बदल केले नसल्याचे सांगत, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणीही फेटाळली. ज्ञानेश कुमारांना यांना हटवण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासारखीच असल्याचे आयोगाने नमूद केले. मतदार यादीतील नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे हे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याच्या आदेशानुसारच होत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
इंजिनिअरिंगची पदवी नाही, तरी बनवली फ्लाईंग कार!
उत्तराखंडच्या तरुणाची कमाल
उत्तराखंडचे रवी टमटा यांनी ‘हपिडा स्कायनेक्स’ नावाची इलेक्ट्रिक फ्लाईंग कार तयार केल्याचा दावा आहे. बीए पदवीधर असलेल्या रवी यांनी पुस्तके आणि इंटरनेटच्या मदतीने १३ वर्षे संशोधन करून ही कार विकसित केली. ही एक आसनी कार असून, डोंगराळ भागातील प्रवास आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी तिचा वापर करण्याची संकल्पना आहे. या कारची चाचणी झाल्याचे सांगितले जात असले, तरी तिला अद्याप सरकारी मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वापर आणि व्यावसायिक उपलब्धतेबाबत पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सर्बियात विद्यार्थ्यांच्या गटाचा मोठा विजय;
अलेक्झांडर वुचिच यांच्या पक्षाला धक्का
सर्बियाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचा दावा केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टुडंट लिस्ट’ गटाने संसदीय निवडणुकीत आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, या गटाला १३५ ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांच्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीला सुमारे १०५ जागा मिळू शकतात. नोवी साद रेल्वे स्थानक दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू केले होते. या निकालामुळे सर्बियाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताची आज मालिका जिंकण्याची संधी;
न्यूझीलंडविरुद्ध विजयासाठी टीम इंडिया सज्ज!
पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज, मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात उतरणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे भारताचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडमध्ये २०२० पासून ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या अलीकडील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजीची चिंता वाढली आहे. वेलिंग्टन येथे होणाऱ्या या सामन्यात भुवनेश्वरच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य राखून विजय मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
‘विजयवर प्रेम करणं वाईट कधीपासून झालं?’;
रश्मिकाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर Top 15 News:
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्यावरून ट्रोलिंग झाल्यानंतर रश्मिकाने आठ पानांची पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिलं. विजयला लग्नासाठी वर्षभर मनवावं लागलं आणि तिने १०० वेळा मागणी घातली, या चर्चेवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर, ‘मी माझ्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करते. ही वाईट गोष्ट कधीपासून झाली?’ असा सवाल तिने केला. नात्यात एकमेकांना वेळ आणि अवकाश देणं महत्त्वाचं असल्याचं सांगत, आपल्या नात्याबद्दल चिंता करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद शोधा, असं आवाहनही तिने केलं.





