Top 15 News : निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना’ मोर्चा , संसदीय समित्यांची फेररचना आणि ‘ट्रम्प मामू, तारीफ करायला शिका’, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना’ मोर्चा
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनीही मोर्चाला पाठिंबा
Top 15 News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी हा मोर्चा असल्याचे ठाकरे बंधूंनी सांगितले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनीही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर मोर्चाचा मार्ग बदलून आता मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा करण्यात आला आहे. मोर्चानंतर प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
MPSC आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया;
फडणवीसांवर साधला निशाणा
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. पेपर लीक, रखडलेल्या सरकारी भरती, महागडे शिक्षण, हॉस्टेलची खराब व्यवस्था आणि DBT मधील कथित गैरप्रकार हे मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडल्याचे गांधी यांनी सांगितले. MPSC अध्यक्षांचा राजीनामा आणि ७० हजारांहून अधिक रिक्त सरकारी पदे भरण्याची मागणी त्यांनी नमूद केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला युवा काँग्रेस व NSUIचा पाठिंबा असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार;
‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा वाढणार
राज्यासह देशभरातून मॉन्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातून मोसमी वारे परतले आहेत. सध्या मॉन्सूनची सीमा परभणी, बारामती आणि हर्णेपर्यंत पोहोचली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतूनही मॉन्सून माघारी जाण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाने काही भागांत उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आता ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागू शकतो. दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
बुलढाण्यात महायुतीत संघर्ष;
श्वेता महाले आणि संजय गायकवाड आमनेसामने
बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमधील वाद चिघळला आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड समर्थकांकडून १० ते १२ महिलांना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला असून, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. यावर गायकवाड यांनी पुरावे सादरा करा, अन्यथा बदनामी थांबवा, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी महालेंवर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वादातून महाले समर्थकांनी गायकवाडांविरोधात कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यात महायुती सत्तेत असली तरी बुलढाण्यातील स्थानिक संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट;
तरुणीची पोलिसांकडून चौकशी
ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा दावा समोर आला आहे. त्यांचा मुलगा राम पूर्णेकरने पोलिसांना दिलेल्या जबाबात, हत्येपूर्वी एका तरुणीला दोन मुलांसोबत खोलीत पाहिल्याचा दावा केला आहे. पूर्णेकर यांनी संबंधितांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणल्याचेही जबाबात नमूद आहे. हत्येपूर्वी आणि नंतर ही तरुणी कार्यालयाबाहेर दिसल्याने तिची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली असून दोन आरोपींना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
खामगाव दौऱ्यात बावनकुळेंचे आदेश;
शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्काळ कारवाई
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खामगाव दौऱ्यात नागरिक आणि शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने अचूक पंचनामे करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील २५६ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि केंद्राकडून मदत मिळण्यासाठी तांत्रिक व प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी क्षेत्रात उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले. दुष्काळात बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या. अनधिकृत सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही पोलिसांना देण्यात आले.
‘सोमेश्वर’च्या भवितव्यासाठी निवडणूक;
सुनेत्रा पवारांचा सभासदांना एकजुटीचा संदेश
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सभासद आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोमेश्वर कारखाना कोण्या एका व्यक्तीची मालमत्ता नसून सभासद शेतकऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या विकासात सभासद शेतकरी आणि कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी बिकट परिस्थितीत कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची भूमिका त्यांनी मांडली. जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वसमावेशक पॅनल उभे केल्याचे सांगत, सोमेश्वरची ‘सर्वाधिक भाव देणारा कारखाना’ ही ओळख कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ऊस गाळपावर शंभूराज देसाईंचा मोठा दावा;
प्रतिटन ७५० रुपयांची भरपाई मागणार
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी कराडसह दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. कराडचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. फेरसर्वेक्षण करून पात्र तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, १५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखाने सुरू करण्याच्या निर्णयामुळे दुष्काळात ऊस गाळपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखानदारांचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी प्रतिटन ७५० रुपयांची भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे देसाईंनी स्पष्ट केले. पाटण तालुक्याच्या दुष्काळी मागणीसाठी पर्जन्यमानाची आकडेवारीही याबाबत सादर करण्यात आली आहे.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने ठाकरेंवर मोर्चाची वेळ’
रामदास आठवलेंची टीका
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि आरपीआयसोबत राहून सत्तेत सहभागी व्हायला हवे होते. मात्र, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे आज त्यांच्यावर मोर्चा काढण्याची वेळ आली असल्याचा दावा आठवले यांनी केला. नवी मुंबईतील वाशी येथे आरपीआयच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पूर्वी नरेंद्र मोदींबाबत चांगले बोलत होते, मात्र आता विरोध करत असल्याचेही त्यांनी म्हटले. आंदोलनाचा अधिकार असला तरी पंतप्रधानांबाबत अपशब्द टाळावेत, असे आवाहन आठवले यांनी केले.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; मदत पोहोचवून न्याय देणार
सचिन अहिर यांचं बळीराजाला अश्वासन
शेतकऱ्यांवर सध्या दुहेरी संकटाची परिस्थिती असून, शासनाकडून सर्वांपर्यंत मदत पोहोचवून न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. आंदोलन करण्यापेक्षा संवादातून प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओंनी अधिक दक्षता घेणे गरजेचे होते, असे अहिर म्हणाले. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा, हा शासनाचा निकष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागे सामाजिक हेतू आहे की राजकीय हेतू, हे जनतेने ठरवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने सर्व घटकांपर्यंत मदत पोहोचवून न्याय देण्याची भूमिका ठेवली असल्याचेही अहिर यांनी नमूद केले.
संसदीय समित्यांची फेररचना;
महाराष्ट्रातील ४० खासदारांना संधी
लोकसभा आणि राज्यसभेच्या विविध संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची वर्षभरासाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे सुधीर गुप्ता, तर संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी राधामोहन सिंह यांची नियुक्ती झाली आहे. डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी यांची ग्राहक व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी मिळाली असून, त्यात लोकसभेतील २९ आणि राज्यसभेतील ११ खासदारांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांची वित्त समितीवर निवड झाली आहे. श्रीरंग बारणे यांच्याकडे ऊर्जा समितीचे, तर सुनील तटकरे यांच्याकडे पेट्रोलियम समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. नारायण राणे कृषी समितीत आहेत.
हरियाणात मोठी राजकीय हालचाल;
मुख्यमंत्री ४८ आमदारांसह दिल्लीत
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधकांकडून आरोप सुरू असतानाच हरियाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी शनिवारी ४८ भाजप आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले. या अचानक दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आमदार विपुल गोयल यांनी हरियाणा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्याचे सांगितले. बैठकीचा अजेंडा अद्याप कळलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. SIR किंवा अन्य विषयावर चर्चा होणार का, याबाबतही निश्चित माहिती नसल्याचे आमदारांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सैनी यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण आणि त्याची खातरजमा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत असल्याचे ‘एक्स’वर सांगितले.
उत्तर कोरियाने पुन्हा डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
हुकूमशाह किम जोंग उन यांच्या हालचालींकडे जगाचं लक्ष
अमेरिका-इराण आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) उत्तर कोरियाने पूर्व समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली. दक्षिण कोरियाच्या लष्करानुसार, हे क्षेपणास्त्र ७०० किमीहून अधिक अंतर पार करून समुद्रात गेले. यापूर्वी २० सप्टेंबरला उत्तर कोरियाने तीन तासांत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. सीमाभागातील स्फोटांमध्ये दक्षिण कोरियाचे तीन सैनिक जखमी झाल्यानंतर तणाव वाढला असतानाच ही चाचणी झाली आहे. त्यामुळे किम जोंग उन यांच्या हालचालींकडे जगाचे लक्ष लागले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सोनेरी जलवा;
८५ पदकांसह चौथे स्थान कायम
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने यंदा २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखले. अखेरच्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली. अमरावतीची १७ वर्षीय कुमकुम मोहोड हिने तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. कुस्तीपटू अमन सेहरावतने ५७ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा ५-१ असा पराभव करत सलग दुसरे सुवर्ण पटकावले. क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवत सुवर्णपदक राखले. गोल्फमध्ये प्रणवी उर्सनेही सुवर्णपदक जिंकले.
‘ट्रम्प मामू, तारीफ करायला शिका’;
संजय दत्तची ‘मुन्नाभाई’ स्टाईल चर्चा Top 15 News :
अभिनेता संजय दत्तने ‘मुन्नाभाई’च्या शैलीत देशातील सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मिश्कील भाष्य केले. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाइट’ कार्यक्रमात बोलताना त्याने, “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही,” अशी खंत व्यक्त केली. पाच मिनिटांसाठी पंतप्रधान झाल्यास काय कराल, या प्रश्नावर संजय दत्तने विदेश दौऱ्यांवरून अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच नेत्यांच्या छायाचित्रांऐवजी देशाला देशाचा फोटो दिसायला हवा, असे म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘ट्रम्प मामू’ म्हणत त्याने टॅरिफ धोरणावरही मिश्कील टीका केली आणि गांधीगिरीचा सल्ला दिला.





