Top 15 News : MPSC पेपरफुटीवरून राज्यात संताप, केंद्र सरकार देणार कमी भाड्यात सुविधांसह घर आणि ‘धाकट्या सूनबाई’मध्ये उषा नाडकर्णींची एन्ट्री?, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यभर संताप व्यक्त होत असताना अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली बाजू मांडली आहे.

MPSC पेपरफुटीवरून राज्यात संताप;
अध्यक्ष म्हणाले, ‘पुरावा द्या, क्षणात पद सोडेन’
Top 15 News : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यभर संताप व्यक्त होत असताना अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली बाजू मांडली आहे. “माझ्याविरोधात एकही पुरावा दिला तर क्षणाचाही विलंब न करता पद सोडेन,” असं त्यांनी स्पष्ट केलं. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीची घटना आपण अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वीची असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी MPSCविरोधात आक्रोश मोर्चा काढला. परीक्षा रद्द झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दिला.
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द;
समाधान सरवणकरांचा शिंदेंबाबत मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं अखेर रद्द करण्यात आलं. पालघर जिल्हा जात पडताळणी समितीचा निर्णय आणि त्याविरोधातील राऊतांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर महापालिका सभागृहात अधिकृत घोषणा झाली. दरम्यान, शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. अपात्रतेच्या कारवाईतून वाचवण्यासाठी राऊतांनी एकनाथ शिंदेंशी दोनदा संपर्क साधला आणि २० नगरसेवक पक्षात आणण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा सरवणकरांनी केला. तसेच सिद्धिविनायक ट्रस्टचं पद न मिळाल्याने राऊत नाराज असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
मोदींचा आज महाराष्ट्र दौरा;
मुंबईत GFF-2026चं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील वडोदरा येथे दुपारी १२ वाजता विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे. यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या ३२६ किलोमीटरच्या महत्त्वाच्या विभागांसह तीन रेल्वे प्रकल्प आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. यावेळी ते Gen-Z तरुणांशी संवाद साधणार असून, देशाच्या आर्थिक आणि डिजिटल क्षेत्राबाबतही भाष्य करण्याची शक्यता आहे.
सरकारी योजना कागदावरच’;
कल्याण काळेंचा आरोप
सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील योजनांची अंमलबजावणी, निरीक्षण आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महानगरपालिका, नगरपालिका आणि विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही काळे यांनी केली. दरम्यान, मराठवाड्यात मागील दोन-तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी काळे यांनी केली.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता ;
‘या’ ५ जिल्ह्यांत विजांसह सरी Top 15 News :
राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेडमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या इतर भागांत आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहू शकतो. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यताही आहे. मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून, त्याच्या प्रभावामुळे हवामानात बदल झाला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मॉन्सूनचे वारे कमजोर असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.
ठाण्यात गणेश दर्शन स्पर्धेला सुरुवात;
‘आनंद दिघेंची प्रबोधनाची परंपरा पुढे नेत आहोत’
ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेला यंदाही उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली सामाजिक प्रबोधनाची परंपरा पुढे नेली जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गणेशोत्सव केवळ सजावट आणि आरास पाहण्यापुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा उत्सव व्हावा, हा आनंद दिघेंचा विचार होता, असं शिंदे म्हणाले. गणेश मंडळांकडून रक्तदान, आरोग्य शिबिरं, रुग्णवाहिका सेवा आणि गरजूंना मदत केली जाते. तरुणांच्या कौशल्य विकासालाही चालना मिळते. ३७ वर्षांची ही परंपरा असून उत्सवात इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन शिंदेंनी केलं.
फक्त आई-बाबांना शोधणारी नजर!
भंडारा डोंगरावर सापडली दीड वर्षांची चिमुकली
पिंपरी-चिंचवडमधील देहूच्या भंडारा डोंगरावर दीड वर्षांची चिमुकली बेवारस अवस्थेत आढळून आली आहे. सध्या ती वायसीएम रुग्णालयात दाखल असून महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत तिची आईप्रमाणे काळजी घेत आहेत. बाळाला जेवण भरवण्यापासून वैद्यकीय तपासण्यांपर्यंत राणी राऊत तिची देखभाल करत आहेत. मात्र, चिमुकलीला अजूनही स्वतःचं नाव किंवा घराचा पत्ता सांगता येत नाही. तिची नजर मात्र सतत आई-बाबांना शोधताना दिसतेय. तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा; तुमच्या एका शेअरमुळे चिमुकली तिच्या आई-बाबांपर्यंत पोहोचू शकते.
मुलीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या;
रमाबाईंच्या मदतीसाठी सरन्यायाधीश सरसावले
अंबाजोगाईतील ‘अमृत दौड’मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावून ३ हजारांचं बक्षीस जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दखल घेतली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत रमाबाईंना आवश्यक मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने रमाबाईंशी संपर्क साधला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा सन्मान करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील ४७ वर्षीय रमाबाई अंबाजोगाईतील अकादमीत स्वयंपाकाचं काम करतात. पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणासोबत त्यांना पोलिस दलात भरती करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या संघर्ष करत आहेत.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार!
जिल्हाधिकारी कार्यालयात मोजणीच्या नोटिसांची होळी
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा उफाळला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमीन मोजणीच्या नोटिसांची सामूहिक होळी केली. ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत आंदोलकांनी विरोध नोंदवला. ई-चावडी पोर्टलवर ९ सप्टेंबरपासून जमीन मोजणी सुरू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांनी केला. संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदन दिलं.
‘येरवड्यात ६ वर्षे राहिलो, तरी मराठी शिकता आली नाही’;
संजय दत्तांच्या वक्तव्याने नवा वाद Top 15 News :
ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्याने मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला मराठीत बोलण्याची विनंती केली. मात्र, संजय दत्तने हलक्याफुलक्या अंदाजात नकार देत, “मी येरवडा तुरुंगात सहा वर्षे घालवली, तरीही मला मराठी शिकता आली नाही,” असं म्हटलं. “थोडीफार मराठी समजते,” असंही त्याने स्पष्ट केलं. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झाल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मोदी सरकारची मोठी योजना;
कमी भाड्यात मिळणार सुविधांसह घर
शहरांमधील वाढत्या घरांच्या किमतींमुळे घर खरेदी करणं कठीण झालेल्यांसाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.०’ अंतर्गत ‘अफोर्डेबल रेंटल हाउसिंग’ योजना महत्त्वाची ठरत आहे. या योजनेत EWS आणि LIG गटातील नागरिक, स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्ती, बांधकाम व कारखाना कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले आणि नोकरदार महिलांना परवडणाऱ्या भाड्याने घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या घरांमध्ये पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, आरोग्य केंद्र, पाळणाघर, दुकाने आणि कम्युनिटी हॉलसारख्या सुविधा असतील. योजना दोन पद्धतींनी राबवली जाणार असून रिकामी सरकारी घरंही भाड्याच्या घरांमध्ये रूपांतरित केली जाणार आहेत.
भाजपला मोठा धक्का!
बड्या नेत्याचा थेट काँग्रेसमध्ये प्रवेश
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार हिरा ठाकुर यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जातीआधारित जनगणनेच्या मुद्द्यावर अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. हिरा ठाकुर हे १२ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच उत्तर प्रदेश मागास वर्ग आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील भूमिकेचं स्वागत केलं. यावेळी काँग्रेस नेत्यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘चंद्र आमचा आहे…’;
ट्रम्प यांचा खास फोटो शेअर नवा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर चंद्राचा फोटो शेअर करत “चंद्र आमचा आहे” असं लिहिलंय. या फोटोमध्ये चंद्राच्या मागे पृथ्वी आणि अमेरिकेचा ध्वज दिसत आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. यासोबतच त्यांनी यूएस स्पेस फोर्सच्या नव्या सर्व्हिस ड्रेस युनिफॉर्मचं डिझाइनही शेअर केलं. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्रम्प यांचा हिरवी पॉवर रिंग घातलेला एआय व्हिडीओही शेअर करण्यात आला. या पोस्ट्सवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
शेफालीला तो इशारा करणं भोवलं ;
पाकिस्तानच्या कर्णधारावर ICCची कारवाई
भारताविरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामीवीर शेफाली वर्माला बाद केल्यानंतर केलेल्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनावर आयसीसीने कारवाई केली आहे. फातिमा सनाने शेफालीकडे पाहत पॅव्हेलियनच्या दिशेने जाण्याचा इशारा केला होता. या प्रकरणी तिला सामना शुल्काच्या १० टक्के दंडासह एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टमधील लेव्हल-1, कलम 2.5 अंतर्गत ती दोषी ठरली. हा तिचा २४ महिन्यांतील दुसरा नियमभंग आहे. यापूर्वी ६ ऑगस्ट २०२५ रोजी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात तिला एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता. फातिमाने आपली चूक मान्य करत शिक्षा स्वीकारली आहे.
‘धाकट्या सूनबाई’मध्ये उषा नाडकर्णींची एन्ट्री?
नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता Top 15 News :
‘झी मराठी’वरील आगामी ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव ही नवी जोडी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता आणखी एका प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्रीची झलक दाखवण्यात आली असून, कॅप्शनमध्ये तिच्या दमदार व्यक्तिमत्त्वाची झलक दिली आहे. चाहत्यांनी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून उषा नाडकर्णी असल्याचं ओळखलं आहे. अभिनेत्री मेघा धाडेनेही “आऊ” अशी कमेंट केल्याने उषा नाडकर्णींच्या कमबॅकच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. आता त्यांची अधिकृत एन्ट्री कधी होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.





