Top 15 News : महाराष्ट्रात दुष्काळी पंचनामे ५ ऑक्टोबरपासून, UPI च्या २ हजारांवरील व्यवहारांवर ३०० रु.पर्यंत शुल्क आणि सलमान खानची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News :

महाराष्ट्रात पावसाची १६ टक्के तूट;
परतीचा मान्सूनही हुलकावणी देणार?
Top 15 News : महाराष्ट्रात यंदा जूनपासून आतापर्यंत सरासरी १६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तूट ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. दरम्यान, १० ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा पाऊसही पुरेसा होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळी पंचनामे ५ ऑक्टोबरपासून;
पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम संकटात
पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत आल्याने राज्यात ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे केले जाणार असून टंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जाणार आहेत. राज्यातील २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडलाय. अनेक भागांत पिके करपली असून कडधान्ये आणि उसाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पश्चिम राजस्थानातून १९ सप्टेंबरपासून मोसमी पावसाच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.
जरांगेंचा पाटोद्यात सरकारवर हल्लाबोल;
उपोषणामुळे दौरा रद्द करण्याचे संकेत
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पाटोदा येथे रात्री उशिरा झालेल्या सभेत सरकारवर जोरदार टीका केली. उपोषणाचा १८वा दिवस असून सलाईन सोडल्यानंतर पुन्हा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. शरीरापेक्षा आरक्षण महत्त्वाचे असले तरी प्रकृती साथ देत नसल्याने पुढील दौरा रद्द करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पाटोद्यातून पोलिसांना सांगून मुंबईला जाण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा करत मराठा समाज आरक्षणाच्या विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही केले.
“नियम-कायदे सांगताय, पण मदतीला मर्यादा आहे का?”;
रोहित पवारांची फडणवीसांवर टीका
राज्यात पावसाअभावी शेतकरी संकटात सापडल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. NDRF सर्वेक्षणाला ५ ऑक्टोबरची मर्यादा असली तरी शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याला कोणती मर्यादा आहे का, असा सवाल त्यांनी केला. सरकारने राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, मजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, विद्यार्थ्यांना फी सवलत आणि पीक विम्याची मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या घरी यंदा फडणवीसांची गैरहजेरी;
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सवात मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते बाप्पांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेली टीका, तसेच अमित ठाकरे यांच्याशी संबंधित मोदींच्या फोटोचा वाद यामुळे भाजप-मनसेमधील मतभेद चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर फडणवीस-शिंदेंची अनुपस्थिती असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का? ;
सलीम सारंग भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा Top 15 News :
राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटकपक्षांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये सारंग यांनी भाजपसोबत सत्तेत राहून मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच भाजपच्या भूमिकेवर भाष्य करताना पक्षाची बाजूही मांडली. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षणासाठी निधी सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यांनंतर सारंग यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार;
२९ सप्टेंबरला हुबळीत २ लाख शेतकऱ्यांचा मेळावा
ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक राज्य रयत संघाने आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ सप्टेंबरला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळीतील गावात दोन लाख शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इथेनॉलची खरेदी किंमत ७० रुपये करावी, साखरेची एमएसपी ५० रुपये किलो करावी, तसेच कारखाने लवकर सुरू केल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्यास विरोध असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी आक्रमक;
क्युमाईन क्लबवर साखळी उपोषण सुरु
धुळे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन आक्रमक झाले आहे. गांजा, गुटखा, सट्टा-मटका यांसारखे अवैध व्यवसाय बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी क्युमाईन क्लब, जेल रोड परिसरात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा दावाही करण्यात आला. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.
नांदेडमध्ये ‘डीजे बंद, पर्यावरण जिंदाबाद’;
गणेश मंडळांचा विशेष सन्मान
गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने विशेष उपक्रम राबविला. डीजे-मुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचे हमीपत्र देणाऱ्या गणेश मंडळांचा नियोजन भवन येथे सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. डीजेमुक्त उत्सवामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होते. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनामुळे नदी व जलस्रोतांचे संरक्षण होते. नांदेडमधील मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत राज्यासमोर आदर्श निर्माण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली गणरायाची आरती
शाडूच्या मूर्तीचे केले कौतुक
जालन्यातील कादराबाद परिसरातील विघ्नहर्ता गणेश मंडळाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देत गणरायाची विधिवत आरती केली. यावेळी त्यांनी गणेशभक्तांना उत्सवाच्या शुभेच्छा देत मंडळाने साकारलेल्या आकर्षक देखाव्याचे कौतुक केले. मंडळाने शाडू मातीची गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केल्याबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा केली. गणेशोत्सवातून सामाजिक एकता आणि बंधुभाव वाढावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पीओपी आणि पाण्यात न विरघळणाऱ्या साहित्याच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होऊ नये, यासाठी विसर्जनावेळी काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, गणेशभक्त, महिला मंडळ आणि चिमुकल्यांची उपस्थिती होती.
UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी;
१५ ऑक्टोबरपासून नव्या शुल्काचा नियम Top 15 News :
UPI व्यवहारांसाठी NPCIने नवा शुल्क आराखडा जाहीर केल्याची माहिती आहे. हा नियम १५ ऑक्टोबर २०२६पासून लागू होणार असून, २ हजार रुपयांपेक्षा अधिक P2M व्यवहारांवर ०.४ टक्के MDR आकारला जाणार आहे. ७५ हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी कमाल ३०० रुपये शुल्क मर्यादा असेल. मात्र, महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत UPI पेमेंट स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. रेल्वे, टेलिकॉम, विमा, इंधन आणि कृषी क्षेत्रातील काही व्यवहारांवर ५ रुपये फ्लॅट MDR राहणार आहे. ग्राहकांकडून MDR वसूल करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
३०व्या वर्षी लष्करातून निवृत्ती;
मेजर ऋषभ सिंह यांना पेन्शन मिळणार का?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी जवळपास १२ वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या ३०व्या वर्षी भारतीय लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे. लडाखसह ४ पॅरा स्पेशल फोर्सेस आणि राष्ट्रपती भवनात त्यांनी सेवा बजावली. नियमानुसार नियमित रिटायरिंग पेन्शनसाठी साधारण २० वर्षांची पात्र सेवा आवश्यक असते. काही विशेष प्रकरणांत किमान १५ वर्षांची सेवा आवश्यक असते. त्यामुळे १२ वर्षांच्या सेवेमुळे त्यांना नियमित मासिक पेन्शन मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, रजेचे रोखीकरण यांसारखे निवृत्तीविषयक लाभ मिळू शकतात.
ब्रिटेनच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?
स्कॉटलंड-वेल्स-उत्तर आयर्लंडचे नेते एकत्र
ब्रिटेनच्या घटनात्मक भवितव्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडच्या प्रमुख नेत्यांनी कार्डिफ येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रदेशांना अधिक निर्णयस्वातंत्र्य आणि घटनात्मक बदलांचा अधिकार असावा, अशी भूमिका नेत्यांनी मांडली. स्कॉटलंडचे जॉन स्विनी, वेल्सचे रून ॲप आयोरवर्थ, उत्तर आयर्लंडच्या मिशेल ओ’नील आणि सिन फेनच्या मेरी लू मॅकडोनाल्ड यांचा करारात सहभाग होता. मात्र, ब्रिटिश सरकारने ब्रिटेनच्या विभाजनाचा धोका फेटाळला आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षानेही या बैठकीवर टीका केली. त्यामुळे करारानंतर ब्रिटेनच्या भवितव्यावर चर्चा सुरू झाली आहे.
क्रिकेटमध्ये इतिहास!
झिम्बाब्वेच्या संघात एकाचवेळी ४० वर्षांवरील तीन खेळाडू
झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात क्रिकेटच्या इतिहासातील अनोखा विक्रम पाहायला मिळाला. झिम्बाब्वेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे तीन खेळाडू मैदानात उतरले. क्रेग एर्विन, ब्रेंडन टेलर आणि सिकंदर रझा यांचा यात समावेश आहे. पूर्ण सदस्य देशाच्या संघाने वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४० वर्षांवरील तीन खेळाडूंना स्थान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, मैदानात उतरताच ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा वनडे कारकिर्दीच्या कालावधीचा विक्रमही मागे टाकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २९४ धावा केल्या.
सलमान खानची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत;
म्हणतो, “सगळं असूनही मी दुःखी का?” Top 15 News :
गणेशोत्सवादरम्यान अंबानींच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. “जेव्हा माझ्याकडे कमी गोष्टी होत्या, तेव्हा मी आनंदी होतो; आता इतकं सगळं असूनही मी दुःखी का?” असा सवाल त्याने पोस्टमधून केला. गरजा, इच्छा, झोप, भूक, पैसा आणि वेळ याबाबतच्या बदलत्या भावनांवर त्याने भाष्य केलं. ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं असून, सलमानने ही पोस्ट नेमकी कोणत्या संदर्भात केली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.





