TOP 15: अजित पवारांच्या अर्धपुतळ्याचे आज अनावरण ते आमदाराची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या आजच्या TOP 15 News
TOP 15: महाराष्ट्र, देश-विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी...

TOP 15: 1. अजित पवारांच्या अर्धपुतळ्याचे आज अमित शहांच्या हस्ते अनावरण
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या अजित पवारांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रिय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळेंसह पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी 10.30 वाजता भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतिलाल मुथा फाउंडेशनच्या मुख्यालयाला अमित शाह भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजता भारतीय इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि ऑनलाइन प्रवेश पोर्टलचं अमित शाहांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
2. विलीनीकरणाची चर्चा अन् राष्ट्रवादीच्या आमदाराने केली थेट निवृत्तीची घोषणा
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर धरला, मात्र सुप्रिया सुळे या सर्वा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याचदरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठा निर्णय घेत थेट राजकारणातून निवृत्ती घेतली. माजलगाव येथे आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजकीय निवृत्तीची घोषणा करत आपला राजकीय वारसदार जाहीरही केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार नसणार असून, आपला पुतण्या जयसिंह सोळंके हा पुढचा उमेदवार असेन. ज्या पद्धतीने आजपर्यंत मला प्रेम आणि साथ दिली, त्याच पद्धतीने यापुढेही सोळंके कुटुंबावर प्रेम कायम ठेवा, असं आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं.
3. मुंबई-नाशिक महामार्गावर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. फास्टॅग स्कॅनिंगचा वेग मंदावल्यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मागील अर्ध्या तासापासून वाहनांच्या रांगा कायम असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यातच वीकेंड असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. टोलनाक्याच्या परिसरात अनेक वाहने रस्त्यावरच थांबल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. या प्रकारामुळे चाकरमानी आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून टोल प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
4. दिवाळी सुट्ट्यांमुळे एसटी बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; चार दिवसांत ९ कोटींचे उत्पन्न!
दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने आणि रविवारच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे, नाशिक, जळगाव, भुसावळ, धुळे आणि बुलढाणा या मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांत छत्रपती संभाजीनगर विभागाला तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ११ ते १४ नोव्हेंबर या चार दिवसांत विभागाच्या ५३३ बसेस रस्त्यावर धावल्या. या बसेसनी मिळून ८ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पुणे आणि नाशिक मार्गावर सर्वाधिक प्रवासी गर्दी असून, पुणे मार्गावरील नियमित ३६ फेऱ्यांमध्ये वाढ करून आता ४४ ई-बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रक प्रत्यक्ष बसस्थानकावर तैनात करण्यात आले आहेत.
5. लातूर जिल्हा बँक निवडणुकीचा आज निकाल; देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँकेतील संचालकांच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी काल 99.4 टक्के मतदान झाले. येथे 999 पैकी 993 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून आज मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आणि महायुतीचे परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि भाजप नेते, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 19 जागा असून, त्यापैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 15 जागांसाठी काल मतदान पार पडल असून आता आजच्या मतमोजणीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
6. ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मॅरेथॉनसाठी 50 लाख रुपये खर्च करण्याची गरज काय?’
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुण्यात 15 नोव्हेंबर 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे रन फॉर युनिटी या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकर तसेच केनियासह विविध आफ्रिकन देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंनी सहभाग घेतला. मात्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मॅरेथॉनसाठी 50 लाख रुपये खर्च करण्याची गरज काय? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्तांनी हे पैसे दिले तरी कसे? आयजीच्या जीवावर बायजी उदार असे म्हणत धंगेकरांनी मोहोळांवर टीका केली. दरम्यान, धंगेकरांच्या टीकेला आता मुरलीधर मोहोळ काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.
7. मुंबईत छठपूजेचा उत्साह; चौपाट्या आणि कृत्रिम तलावांवर भाविकांची मांदियाळी!
मुंबईतील विविध चौपाट्या आणि कृत्रिम तलावांवर छठपूजेनिमित्त मोठी रेलचेल पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला आणि पुरुषांनी पाण्यात उभे राहून सूर्यदेवाला आणि छठी मैयाला अर्घ्य अर्पण केले. या सोहळ्यासाठी मुंबईत शिवसेनेच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी कृत्रिम तलाव, चेंजिंग रूम आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
8. ‘आ बैल मुझे मार’; ट्रेडमार्कवरून चाकणकरांवर दिपाली सय्यद यांची टीका
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्वतःचे नाव, फोटो आणि वैयक्तिक सादरीकरण शैलीची ‘ट्रेडमार्क नोंदणी’ केल्याची माहिती दिली. यावरून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटातील अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी चाकणकर यांच्या या निर्णयावर टीका केली. “रूपाली चाकणकरांचं पुन्हा एकदा ‘आ बैल मुझे मार’ असं झालं आहे. चाकणकर यांनी ट्रेडमार्क नोंदणी केली म्हणजे महाराष्ट्रात आता कोणी साडी नेसायची नाही का? तसेच, इथे लोणावळ्यातच रूपाली नावाच्या अनेक मुली आहेत. एक कलाकार म्हणून मी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट भोंदूगिरीविरोधात असून, त्यात मी एका राजकीय महिलेची भूमिका साकारली आहे. मात्र, चाकणकर स्वतःहून आपणच ती व्यक्ती असल्याचे सांगत आहेत,” असे दिपाली सय्यद म्हणाल्या.
9. चक्रीवादळाचा धोका! ९ राज्यांना इशारा, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील ९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अंदमान आणि निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळसह ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पण राज्यात थंडी वाढली आहे.
10. टायगर श्रॉफ प्रकरणात अटक केलेल्या गणेश लांडगेच्या कुटुंबीयाने पोलिसांचे आरोप फेटाळले
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने ठाण्यातील गणेश लांडगे याला मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून अटक केली होती. या कारवाईत दोन गावठी पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. मात्र आता गणेश लांडगेच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबे यांनीही पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टायगर श्रॉफ गोळीबार झाला त्या दिवशी गणेश हा छोट्या भांडणाच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. ३१ तारखेला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मुंबईत गेला होता. माझ्या मुलाचा बिश्नोई गँगशी किंवा गोळीबार प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गणेशच्या आईने केला आहे.
11. सीजेपीचा संघटना विस्तार करण्यावर भर; महाराष्ट्रासह 10 राज्यात टीमची निवड
कॉकरोच जनता पार्टीने त्यांच्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी झोनल प्रभारी जाहीर केले. सीजेपीनं क्षितिज पगार यांना पश्चिम विभागाचे प्रभारी, डॉ. विवेक सांगवान यांना उत्तर विभागाचे प्रभारी नियुक्त केलं आहे. मुहम्मद जनैद आणि गीगराज जोरली यांना उत्तर विभागाच्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. तसेच जम्मू कश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, ईशान्य भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या 10 राज्यात समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.
सीजेपीच्या उत्तर प्रदेश समितीत 16 सदस्य, महाराष्ट्रात 15, झारखंडमध्ये 14, ईशान्य भारतात 14, बिहारमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 12, हरियाणामध्ये 6, राजस्थानमध्ये 5, उत्तराखंडमध्ये 6 आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 सदस्य आहेत. सीजेपीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार या समित्या त्यांच्या विभागात संघटनेच्या कार्यक्रमांची आखणी करून प्रत्यक्ष जमिनीवर संघटना बांधणी करणे आणि प्रभाव वाढवणे हे काम करणार आहे.
12. ‘वोट-चोर-गद्दी-छोड’ इटलीतील नेत्याच्या घोषणेवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
इटलीचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी हैदराबाद येथील काँग्रेसच्या ‘भारत समिट २०२६’ कार्यक्रमात मंचावरून ‘वोट-चोर-गद्दी-छोड’ अशी घोषणाबाजी केली. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी टाळ्या वाजवत हसताना दिसून आले. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर भारत विरोधी आणि भारताचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी, “जेव्हा एखादा परदेशी नागरिक भारताचा अपमान करतो, तेव्हा कुणाला हसताना बघितले आहे का? मी अशा भारतीयांबद्दल विचारत नाहीये जे परदेशात जाऊन भारताचा अपमान करतात,” असे ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
13. जेनसन हुआंग यांच्या कमबॅकची चर्चा; एलॉन मस्क यांची मध्यस्थी?
एनव्हिडिया Nvidia चे माजी सीईओ जेनसन हुआंग यांचं विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण उघड झाल्याने त्यांना महत्त्वाचे पद सोडावं लागलं होतं. मात्र आता त्यांना पुन्हा एकदा कंपनीच्या सीईओ पदी नेमलं जाईल अशी शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे एलॉन मस्क आणि एपिक गेम्सचे सीईओ टिम स्वीनी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशीही माहिती समोर आली आहे. एका सहकाऱ्याने असं सांगितलं की सिलिकॉन व्हॅलीचे काही अधिकारी आणि व्यावसायिक यांनी मिळून एक वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुमचा मुख्य हेतू हा जेनसेन हुआंग यांना एनव्हिडीया कंपनीच्या सीईओपदी परत आणलं जावं हाच आहे. या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळतो आहे असंही समोर आलं आहे.
14. आयसीसीची मोठी घोषणा! भारताला मिळाली दोन मोठ्या विश्वचषकांची यजमानपदे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी २०३५ पर्यंत होणाऱ्या सर्व प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या आयोजन कालावधीला (विंडो) अधिकृत मंजुरी दिली आहे. या नव्या वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, २०२९ मध्ये पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात खेळवण्यात येणार आहे. भारत ९ ते २८ ऑक्टोबर २०२९ दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे एकट्याने यजमानपद भूषवणार आहे, तर ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०३१ दरम्यान बांगलादेशच्या साथीने एकदिवसीय विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद पार पाडणार आहे. २०३५ मध्येही वनडे वर्ल्ड कपचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
15. ‘पंचायत 5’साठी पाहावी लागणार वाट; रिलीज डेटबद्दल अपडेट समोर
‘पंचायत’ या वेब सिरीजच्या ५ व्या सीजनच्या रिलीज डेटबद्दल शोच्या मेकर्सनी माहिती दिली आहे. यापूर्वी मेकर्सनी संकेत दिले होते की ‘पंचायत ५’ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२६ च्या आसपास पाहायला मिळू शकेल. मात्र प्राईम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, ‘पंचायत सीजन ५. या वर्षी येणार नाही.” या पोस्टखाली ‘बताते हुए खेद है, पंचायत का अगला सीझन कैद है-बनराकस’ असं कॅप्शन लिहिलं आहे. यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही पोस्ट गांभीर्याने केलेली आहे की विनोदाचा भाग आहे, हे आगामी दिवसांत कळून येईल.
हेही वाचा:
Fodder cultivation: पिंपरी चिंचवडमधून जाणार दुष्काळी भागात चारा; लष्कराच्या ५०० एकरावर चारा लागवड








