Fodder cultivation: पिंपरी चिंचवडमधून जाणार दुष्काळी भागात चारा; लष्कराच्या ५०० एकरावर चारा लागवड
मार्च-एप्रिलमध्ये टंचाईग्रस्त जिल्ह्यांना चारा पुरविण्याचा महापालिकेचा हेतू

पिंपरी – राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून आगामी काळात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई भासणार आहे. दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने लष्कराच्या मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे पाचशे एकर पडीक जमिनीवर चारा लागवडीची तयारी सुरु केली आहे. हा चार मार्च-एप्रिलमध्ये टंचाईग्रस्त जिल्ह्यांना पुरविण्याचा हेतू महापालिकेचा आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि पशुधनासाठी मदतीचे आवाहन राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरात असलेल्या लष्कराच्या मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे ४०० ते ५०० एकर पडीक जमिनीवर चारा लागवड केली जाईल. संबंधित जमीन तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा प्रस्ताव लष्कर प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
लष्कराकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर जमिनीची मशागत करून लागवडीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जमिनीत मका आणि इतर चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याचे नियोजन असून, साधारण दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच मार्च-एप्रिलपर्यंत चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
तयार होणारा चारा केवळ पुणे जिल्ह्यात नाही, तर ज्या जिल्ह्यांमध्ये चाऱ्याची सर्वाधिक टंचाई आहे. त्या भागांमध्ये पाठविण्याचे नियोजन आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार चाऱ्याचे वितरण केले जाणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास मदत होईल.
पडीक जमिन व सांडपाणी वापराचा प्रयोग
महापालिकेच्या म्हणण्यानुसार हा चारा उत्पादित करण्यासाठी लष्काराची पडीक जमिन वापरली जाईल. परंतु, त्या बरोबरच चारा लागवडीसाठी पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करून चारा उत्पादन करण्याचा दुहेरी उद्देश साध्य होईल. तसेच, दुष्काळी स्थितीत पाण्याचा पुर्नवापर करून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.
‘दुष्काळाच्या संकटात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपल्या परीने मदतीसाठी पुढे यावे, या भूमिकेतून महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. उपलब्ध जमीन, प्रक्रिया केलेले पाणी आणि महापालिकेची यंत्रणा यांचा समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन करण्याचा हा प्रयत्न आहे. लष्कराकडून जमीन उपलब्ध होण्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरु केले जाईल.’ – डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
Pimpri-Chinchwad: मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांचा दणदणाट; नियमांची ऐशीतैशी!





