TOP 15: अमित शहा पुणे दौऱ्यावर ते भाजप नेत्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; जाणून घ्या TOP 15 News
TOP 15: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील राजकीय घडामोडी...

TOP 15: 1. ‘सुनील तटकरे येत्या 2 ते 4 दिवसांत वेगळा निर्णय घेऊ शकतात’
आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत ते राजकीय मोठा निर्णय घेऊ शकतात असे म्हटले. तटकरे येत्या दोन ते चार दिवसांत काही वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असा दावा दळवींनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता तटकरे यांना पूर्वीसारखे महत्त्व दिले जात नसल्याचेही त्यांनी म्हटले. तटकरे यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी अनेकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोपही दळवींनी केला. आगामी काळात जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले. श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तटकरेंनी त्याला हायजॅक केलं होतं, मात्र यापुढे हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार, असे आव्हानही दळवींनी सुनील तटकरेंना दिले.
2. मुंबईकरांना महागाईचा झटका! CNG च्या दरात दीड रुपयांची वाढ
मुंबईत वाहनचालकांना महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता CNG साठी प्रतिकिलो 91.50 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील तणाव, देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील घट आणि परदेशातून महागड्या दराने गॅस आयात करावा लागत असल्याने कंपनीच्या खर्चात वाढ झाल्याने दर वाढवण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका CNG वर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसण्याची शक्यता आहे. तसेच खासगी वाहनधारकांच्या खिशालाही आता अधिकचा भार सहन करावा लागणार आहे.
3. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सहकार पॅनलच्या बाजूनेच मतदारांचा कौल असेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. आज सकाळी त्यांनी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
4. दुष्काळाची झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मागील 3 दिवसांपासून जिल्ह्याच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान घसरला आहे. निफाड, जेऊर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तापमानात घट झाली आहे. राज्यातील कमाल तापमान अजूनही ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सकाळच्या थंडीत वाढ होऊ शकते.
5. आदिवासी समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – एकनाथ शिंदे
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि जनजातीय गौरव दिन असा दुहेरी उत्सव आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.आदिवासी समाजाला मोठे पाठबळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार करत आहे. आदिवासी समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
6. अमित शहा पुणे दौऱ्यावर; पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या दोन दिवस पुणे भेटीवर असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहे. लोहगाव हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी, सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई केली आहे. कोरेगाव पार्क नाॅर्थ मेन रोड, जहाँगीर हाॅस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरु मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील सादलबाबा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावरही सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई आहे. तर सोमवारी सकाळी सातनंतर किराड चौक ते नेहरु मेमोरिअल हाॅल चौक मार्ग वाहतुकीस बंद असेल. पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी माॅल ते हाॅटेल ब्ल्यू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असेल.
7. पुर्णेकर प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाला दीड महिना झाला. हत्येप्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप करत प्रदिप यांचे पुत्र राम पुर्णेकर यांनी पोलिसांना पुरावे दिले आहेत. मात्र यानंतरही या दोघांना अद्यापही अटक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने शनिवारी बैठक आयोजित केली होती. त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा झाली बैठकीत पुर्णेकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी अधिवेशनापूर्वी १ किंवा २ डिसेंबर रोजी ठाण्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चानंतरही अटक झाली नाहीतर आंदोलनस्थळी धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
8. नाना पाटेकरांच्या नावे नवी मुंबईत उभारणार नाट्यगृह
सध्या नवी मुंबईतील वाशी आणि ऐरोली येथे नाट्यगृहे आहेत. मात्र, शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने इतर भागांमध्येही नाट्यगृहांची मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊननवी मुंबई शहरात चार नवीन नाट्यगृहे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. घणसोली आणि नेरूळ येथे नवीन नाट्यगृहे उभारण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन नाट्यगृहांना मराठी कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची नावे देण्यात येणार आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार दादा कोंडके, विठ्ठल उमप, मच्छिंद्र कांबळी आणि नाना पाटेकर या प्रसिद्ध कलाकारांच्या नावांचा विचार करण्यात येणार आहे.
9. छटपूजेदरम्यान शिवाजी पार्क, दादर चौपाटीवर फटाके फोडण्यास विरोध
रहिवाशांची पोलिसांकडे तक्रार
मुंबईतील छटपूजेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क आणि दादर चौपाटी परिसरात फटाके फोडण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स वेल्फेअर ALM च्या वतीने 12 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या छटपूजेच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरात पोलिसांनी नियमित गस्त घालून देखरेख ठेवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
10. वनमंत्री गणेश नाईक य नक्की भाजपाचे आहेत का? मंदा म्हात्रेंची टिका
वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील वाद समोर आले आहेत. नवी मुंबईकरांच्या गरजेची असलेली शहरातील अनेक कामे मी आमदार म्हणून मंजूर करून आणल्या नंतर त्याला विरोध करायचे काम येथील भाजपाचे नेते करीत आहेत. रूग्णालय , लॅब्ररी, मरिना सेंटर , स्टेडियम अशी शहरवासीयांसाठी गरजेची कामे सरकार कडून मंजूर केली आहेत. यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे. याला विरोध करून ती कशी होणार नाहीत याची काळजी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक घेत आहेत. भाजप आमदारांच्या कामाला भाजपचा मंत्री विरोध करीत असल्याने हे नक्की भाजपाचे आहेत का याची डीएनए टेस्ट करायला पाहिजे,असा गंभीर आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय.
11. हरदीप सिंग पुरी यांनी दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी हरदीप सिंह पुरी यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीत गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इतर दोन उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले होते. त्यामुळे हरदीप सिंग पुरी हे एकमेव उमेदवार राहिले होते, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे राज्यसभेकडून या संदर्भात एक निवेदन जारी करत हा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वीकारला असल्याचे सांगितले आहे. हरदीप सिंह पुरी यांचा उत्तर प्रदेशातील सध्याचा राज्यसभेचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपणार होता. त्यामुळे पक्षाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती.
12 . टीव्ही पाहण्यासाठी मुलाला द्यावी लागते दर 10 मिनिटांनी परीक्षा
वडिलांची भन्नाट युक्ती
चीनमधील एका वडिलांनी मुलगा सतत टीव्ही पाहत असल्याने एक भन्नाट युक्ती शोधली आहे. वडीलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेत मुलगा टीव्ही पाहत असताना दर दहा मिनिटांनी स्क्रीनवर शालेय अभ्यासक्रमातील एक प्रश्न येतो. जोपर्यंत मुलगा त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देत नाही, तोपर्यंत त्याला टीव्हीवर पुढचा कार्यक्रम पाहता येत नाही. एका वृत्तानुसार, चीनमधील दक्षिणेकडील शेनझेन शहरात राहणारे हे वडील व्यवसायाने टॅक्सीचालक आहेत. मात्र, मुलाची टीव्ही पाहण्याची सवय कमी त्यांनी एआयच्या मदतीने ‘क्वेश्चन-अन्सरिंग की’ नावाचा प्रोग्राम तयार केला. त्यानंतर त्यात काही बदल करून तो टीव्हीला जोडला. यानुसार, मुलगा टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना दर दहा मिनिटांनी स्क्रीनवर त्याच्या शाळेतील अभ्यासक्रम आणि प्रगतीनुसार एक प्रश्न दिसतो. मुलाने चुकीचं उत्तर दिल्यास त्याला आणखी एक प्रश्न सोडवावा लागतो. योग्य उत्तर दिल्यानंतरच त्याला पुन्हा कार्यक्रम पाहता येतो.
13. पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक दिल्लीतील कार्यक्रमाला लावणार हजेरी
भारतात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत पाकिस्तानचे हवामान बदल खात्याचे मंत्री मुसादिक मलिक सहभागी होतील, अशी घोषणा पाकिस्तानने शनिवारी केली. या बैठकीत सांस्कृतिक देवाणघेवाण, सहकार्य आदी विषयांवर चर्चा होणार आहे. एससीओ सदस्य देशांची ही महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. भारताने २८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की, प्रस्थापित प्रथेनुसार एससीओच्या सर्व सदस्य देशांना या बैठकीसाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारत आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमात त्यांचा सहभाग म्हणजे भारताबरोबरचा तणाव कमी करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे संकेत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात एससीओ सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
14. भारतातून पळ काढल्यानंतर आता ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक
इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याची घोषणा केली आहे. ललित मोदी यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याची अधिकृतपणे घोषणा शनिवारी ‘ऑक्सफोर्ड युनियनमध्ये बोलताना केली आहे. तसेच या संदर्भात एक्सवर एक पोस्ट शेअर करत ललित मोदी यांनी ब्रिटीश नागरिक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून आता आपल्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये आर्थिक अनियमितता, मनी लॉन्डरिंगसह विविध आरोप आणि चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर ललित मोदी यांनी भारतातून पळ काढला होता. त्यानंतर ललित मोदी यांना भारतात कधी आणलं जाणार? असा सवाल केला जात असतानाच आता ललित मोदी यांनी अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याची घोषणा केली आहे.
15. यश राज फिल्म्सच्या हॉरर चित्रपटात वरुण धवनची एन्ट्री
यश राज फिल्म्सच्या पहिल्याच हॉरर चित्रपटात बॉलिवूड अभिनेता वरुण धवन दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार असून, अभय पन्नू या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अद्याप शीर्षक निश्चित न झालेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एक नवा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हॉरर अनुभव घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन यश राज फिल्म्ससोबत दुसऱ्यांदा काम करणार आहेत. या प्रोजेक्टमधून अभिनेता एका पूर्णपणे नव्या सिनेमॅटिक विश्वात प्रेक्षकांसमोर येणार आहे. वरुण धवनचा हा हॉरर सिनेमा ३१ मार्च २०२८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





