Top 10 News : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण स्थगित, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा फेरबदल आणि ‘कापूस कोंडा’च्या टीझरने वाढवली उत्सुकता, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण तब्बल 17 दिवसांनंतर स्थगित करण्यात आलं आहे.

17 दिवसांच्या संघर्षाला यश!
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण स्थगित
Top 10 News : पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण तब्बल 17 दिवसांनंतर स्थगित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. आदिवासी वसतिगृहांमध्ये डीबीटीऐवजी ‘मेस’ सुविधा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी कृती आराखडाही तयार केला जाणार आहे. सेंट्रल किचन आणि साडेबारा हजार पदांच्या भरतीसाठी सरकारने तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, या कालावधीत आश्वासने पूर्ण न झाल्यास मुंबईत पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा फेरबदल;
१० प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान शरद पवार गटाने पक्षात मोठा फेरबदल केला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली. यात जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ नये, हेच आपले मत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश!
गोंधळात झालेली हायकोर्ट क्लार्क टायपिंग टेस्ट रद्द
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, कीबोर्ड न चालणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलनही करण्यात आले. या प्रकरणाचा पाठपुरावा आमदार रोहित पवार यांनीही केला होता. आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या परीक्षेची तारीख लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्राचे भाविक अडकले;
143 जणांच्या मायदेशी परतीला सुरुवात!
नेपाळमधील भीषण महाप्रलयानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरचे 106 भाविक काठमांडूमध्ये अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांची सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली असून ते रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले आहेत. तसेच कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्रातील 37 भाविकही मुंबईत परतत आहेत. मात्र, नेपाळमध्ये अडकलेल्या मुंबईतील डॉक्टर दांपत्याचा अद्याप संपर्क झालेला नाही. डॉ. आनंद देशपांडे आणि डॉ. गायत्री देशपांडे यांच्या शोधासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून राज्य सरकार केंद्र आणि नेपाळ प्रशासनाच्या संपर्कात आहे.
आरबीआयचा मोठा निर्णय!
अहिल्यानगरच्या अशोक सहकारी बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोक सहकारी बँक लिमिटेडवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. 28 ऑगस्ट 2026 पासून बँकेतील ठेवी आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय काढता येणार नाहीत. तसेच नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे, गुंतवणूक आणि मालमत्ता विक्रीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवस्थापनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीचे संरक्षण मिळणार आहे.
‘जरांगेंना भाजपने रेड कार्पेट टाकलं तर पक्ष संपेल’;
लक्ष्मण हाकेंचा घणाघात
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे जात वर्चस्वाची भाषा बोलत असून मुख्यमंत्र्यांचा अपमान करत असल्याचा आरोप हाके यांनी केला. ‘भाजपने जरांगेंना रेड कार्पेट टाकलं, तर भाजप संपून जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 1 सप्टेंबरला पुण्यातून आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोर्चात नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज सहभागी होणार आहे. सरकारने 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा दावाही हाके यांनी केला.
‘शुद्धीकरण’ विधीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल;
म्हणाले, ‘ही अस्पृश्यतेची मानसिकता’
हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर कथित ‘शुद्धीकरण’ विधी झाल्याच्या आरोपावरून राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. अशा प्रकारचे विधी म्हणजे अस्पृश्यतेच्या मानसिकतेचे दर्शन असून संविधानाने अस्पृश्यता गुन्हा ठरवली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. देशात संविधानवादी विचारसरणी आणि भाजप-आरएसएसची विचारसरणी यांच्यात संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेचा निषेध करत भाजप अशा कृत्यांचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मुस्लिमांनी भारतात राहू नये’ म्हणणारा खरा हिंदू नाही;
न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हिंदुत्व, एकता आणि सर्वधर्मीय सलोख्यावर भाष्य केलं. ‘भारतात मुस्लिमांनी राहू नये’ असं मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने हिंदू असू शकत नाही, असं भागवत म्हणाले. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’मध्ये बोलताना त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’चा विचार मांडला. धर्म अनेक असले तरी मानवता एकच असल्याचं त्यांनी सांगितलं. मतभेद संघर्षातून नव्हे, तर संवाद आणि परस्पर समजुतीतून सोडवले पाहिजेत, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर यापूर्वीही वाद झाला होता.
‘द ग्रेट खली’च्या गाडीचा भीषण अपघात;
सुदैवाने खली सुखरूप!
WWE मध्ये भारताचे नाव गाजवणारे ‘द ग्रेट खली’ उर्फ दिलीप सिंह राणा यांच्या गाडीचा हरियाणातील पानिपतजवळ अपघात झाला. कुरुक्षेत्रहून सोनीपतला जात असताना जीटी रोडवर त्यांच्या फॉर्च्यूनरची एका इनोवा कारला मागून धडक बसली. या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले, मात्र खली आणि त्यांचे चालक पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खली यांनी इनोवा चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. गाडी बंद पडल्याने ते काही वेळ महामार्गावर थांबले होते. त्यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
२५ वर्षांनंतर सचिन-मधुराणी पुन्हा एकत्र!
‘कापूस कोंडा’च्या टीझरने वाढवली उत्सुकता Top 10 News :
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तब्बल २५ वर्षांनंतर ‘कापूस कोंडा’ या चित्रपटातून पुन्हा एकत्र येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंधांची मनोरंजक गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टीझरमधील सचिन पिळगावकर यांचा खास डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सचिन मोहिते दिग्दर्शित हा चित्रपट लातूर जिल्ह्यातील अंधारी गावात चित्रित करण्यात आला असून, तो २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.





