शिवसेना आमदार संजय गायकवाडांना मोठा झटका Top 10 News : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाकडून आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे. प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र, आता न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्याने याप्रकरणात पुढील कारवाईची आणि गुन्हा नोंदवण्याची वाट मोकळी होऊ शकते. दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांना अद्यापही आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरुच आहेत.याविषयी आंबी यांनी माहिती दिलीय. मतीन पटेल पोलिसांना शरण येणार राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी जोडल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, सोमवारी पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पटेल शरण येणार असल्याचं म्हटलं जातंय महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री! एकीकडे उन्हाचे चटके लागत असतानाच दुसरीकडे राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यासह कोकण आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्याला पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर राहणार असले, तरी आकाश ढगाळ राहील. तसेच मुंबई व आसपासच्या भागात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार? भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच जिंकतो, पण बॅलेट पेपरवर आम्हीच बाजी मारणार,” असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती, तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी – गुलाबराव पाटील Top 10 News : राज्याच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केलीय. या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलय. मागणी केली असली तरी या बाबतचा निर्णय वरच्या पातळीवर चर्चा होऊन घेतला जाईल,तो जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असणार असल्याचं ही पाटील यांनी म्हटलं. पण जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने देखील दावा केला आहे.त्यामुळं या जागेवर काय निर्णय होणार हे पाहणं गरजेचं आहे. तेलंगणात 16 जणांचा उष्माघाताने मृत्यू देशाचा बहुतांश भाग तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे 16 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री श्रीनिवास रेड्डी यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 47°C पर्यंत होते. या 11 राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. खासगी एजन्सी AQI नुसार, शुक्रवारी जगातील 50 सर्वात उष्ण शहरांच्या यादीतील सर्व शहरे भारतात होती. सर्वात उष्ण शहरांच्या यादीत एकट्या उत्तर प्रदेशातील 22 शहरांचा समावेश होता. व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार ; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले वॉशिंग्टन डीसी येथे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना व्हाइट हाऊसजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली. यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले. ही घटना 17th Street आणि परिसरात घडली. दरम्यान या घटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहे. मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं अमेरिका हादरलं असून राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात करार झालेला नाही. अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही. अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणवर मोठी कारवाई करण्याचे संकेत देत आहे. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यामध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दिसून येत आहे. या फोटोनं जगभर खळबळ उडालीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतंही भाषण पोस्ट न करता ही पोस्ट शेअर केलीय. त्या पोस्टमधील इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा असून त्यावर यूनायटेड स्टेटस ऑफ मिडल ईस्ट असं लिहिलं आहे. त्यांच्या या कृतीनं अमेरिकेकडून इराणला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं जातंय. क्रिकेटमध्ये लवकरच नवीन ४ नियम येणार ? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. यात केवळ टी २० नाही तर, वनडे, कसोटी क्रिकेटचाही समावेश आहे. सामना सुरू असतानाच अचानक लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो. हे सर्व नवे बदल आयसीसीच्या विचाराधीन आहेत. पण ते लवकरच अंमलात आणले जाऊ शकतात. ३० मे रोजी अहमदाबादमध्ये आयसीसीची बोर्ड मिटिंग होणार आहे. त्यात काही नियमांना मंजुरी मिळू शकते. त्यासोबत १ ऑक्टोबर २०२६ पासून हे सर्व नवे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले जाऊ शकतात,असेही सांगण्यात येत आहे. ‘माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इन मध्ये राहा…’ Top 10 News : टेलिव्हिजनवरचं सतत चर्चेत असणारं स्टार कपल सध्या भलतंच चर्चेत आहे. सध्या दोघेही ‘देसी ब्लिंग’कार्यक्रमात एकत्र काम करणार आहेत. नुकतंच करण कुंद्रा यानं शोमध्ये तेजस्वी प्रकाश हिला लग्नासाठी मागणी घातली.दरम्यान, तेजस्वी प्रकाश हिनं नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलेलं आणि आपल्या नात्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. तेजस्वी प्रकाश याविषयी बोलताना, “माझ्या आईला हेच हवं होतं की, करणला कंफर्टेबल वाटावं. माझ्या आईनंच सांगितलेलं की, लग्नाचा विचार करण्यापूर्वी आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावं… अनेकजण याच्या विरोधात आहेत, पण माझ्या आईचं म्हणणं आहे की, आम्ही एकत्र राहून पाहायला हवं, मगच लग्नाचा विचार करावा…” असं म्हणत मोठा खुलासा केला.तिच्या या खुलाशावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येतायेत.