Top 10 News: शरद पवारांचा पाक संघटनेत महत्वाचा निर्णय, “मोदींनी देशालाच परिवार मानलं” आणि ‘झिम्मा ३’च्या शूटिंगला सुरुवात, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत.

शरद पवारांचा महत्वाचा निर्णय
पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला
Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सुशील बोर्डे यांची विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच युवक संघटनेत शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आली असून विशाल शंकर वाकडकर यांची शहर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी युवती संघटनेतही अशीच विभागणी करण्यात आली होती. या फेरबदलांमुळे शरद पवार यांनी पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
“मोदींनी देशालाच परिवार मानलं”
पंकजा मुंडेंकडून मोदींचे कौतुक
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीतील अनुभव सांगितला. अमेरिकेचा दौरा पूर्ण करून कोणतीही विश्रांती न घेता मोदी थेट बैठकीला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. उपवास असतानाही केवळ गरम पाणी पिऊन त्यांनी साडेआठ तास चाललेल्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक मतदारसंघ आणि विकासकामांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. ज्यांना परिवार नाही म्हणून हिणवले गेले, त्यांनी देशालाच आपला परिवार मानल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी मोदींच्या समर्पणाचे कौतुक केले.
केंद्र सरकारकडून राज्याला मोठं गिफ्ट
तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी
महाराष्ट्राच्या विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. करांच्या वाटपापोटी केंद्राकडून महाराष्ट्राला तब्बल 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मिळून 1.09 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त अग्रीम करहप्ता वितरित केला आहे. या निधीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, विकासकामे, भांडवली खर्च आणि विविध लोककल्याणकारी योजनांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला आणि विकासकामांच्या अंमलबजावणीला मोठे बळ मिळणार आहे.
न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर…
उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर उद्धव ठाकरे यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत बोलताना, पक्षचिन्ह आपल्यालाच मिळेल, अन्यथा ते गोठवले जाईल, असे ठाकरे म्हणाले. तसेच सध्याचा काळ पक्षवाढीसाठी अनुकूल असल्याने पदाधिकाऱ्यांनी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यासह पक्षबांधणी मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांची सरकारने माफी मागावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
बोलता बोलता अमित ठाकरे भाषण विसरले
मनसैनिक काही काळ अवाक् Top 10 News:
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात अमित ठाकरे यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत होते. यावेळी नव्या प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचे आवाहन करत असतानाच ते अचानक थांबले आणि काय बोलायचे होते हे विसरल्याचे सांगत व्यासपीठापासून दूर गेले. या प्रकारामुळे उपस्थित मनसैनिक काही काळ अवाक् झाले. मात्र सुमारे दहा मिनिटांनंतर अमित ठाकरे पुन्हा व्यासपीठावर आले आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत तडाखेबंद भाषण पूर्ण केले.
देशात नव्याने पेट्रोल-डिझेल दर जाहीर
बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर कायम
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असले, तरी काही ठिकाणी स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे किरकोळ बदल करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, जयपूर, हैदराबाद आणि चंदीगडमध्ये दर जैसे थे आहेत. मात्र, नोएडामध्ये पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 19 पैसे महागले आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले असून लखनौमध्ये दोन्ही इंधनांच्या दरात 30 पैशांची घट झाली आहे. पटना येथे पेट्रोल 75 पैसे आणि डिझेल 71 पैशांनी स्वस्त झाले आहे.
‘आप’ने उचलला नवीनच मुद्दा,
अडीच लाख स्वाक्षऱ्यांचे पंतप्रधानांना निवेदन
E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची धार तीव्र केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर पायी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ‘नॅशनल टाउन हॉल अगेंस्ट E20’ कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. केजरीवाल 100 समर्थकांसह पंतप्रधानांना E20 विरोधातील 2.60 लाखांहून अधिक नागरिकांच्या ऑनलाइन स्वाक्षऱ्यांची प्रत सादर करणार आहेत. शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करणे, E20 पेट्रोलचे दर कमी करणे आणि पेट्रोल 84 रुपयांपेक्षा कमी दरात विकण्याची मागणी त्यांनी केली. तसेच भारत-अमेरिका व्यापार करारावरही त्यांनी टीका केली.
पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले,
दोन वैमानिकांसह १३ जणांचा मृत्यू
पेरूमधील नाझ्का शहराजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 11 पर्यटक आणि दोन वैमानिकांचा समावेश आहे. ‘एरोडियाना’ कंपनीचे हे पर्यटन विमान नाझ्का लाइन्सचे हवाई दर्शन घडवत असताना कोसळले. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते एका शेतात कोसळले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाझ्का लाइन्स हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून, दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. यापूर्वीही 2022 आणि 2010 मध्ये अशाच पर्यटन विमान अपघातांत अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटन उड्डाणांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र!
एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी ऐतिहासिक कामगिरी करत एका दिवसात तब्बल सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकली. बॉक्सिंगमध्ये भारताने सर्वाधिक सुवर्णपदके पटकावत अव्वल स्थान मिळवले. प्रीती पवार, जैस्मिन लँबोरिया, अरुंधती, सचिन आणि अंकुश पांघल यांच्यासह भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांची लयलूट केली. अंकुशने पुरुषांच्या 80 किलो गटात इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा फरकाने पराभव करून भारताचे सातवे सुवर्ण जिंकले. लव्हलिना बोरगोहेन, जादूमणी सिंह आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्यपदके मिळवली. अॅथलेटिक्समध्ये प्रवीण चित्रवेल व शुभम जुयाल यांनी रौप्य, तर जूडोमध्ये उन्नती शर्माने कांस्यपदक जिंकले. भारताच्या खात्यात आता 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 38 पदके जमा झाली असून पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.
पुन्हा जाणार मैत्रिणींची भन्नाट ट्रिप!
‘झिम्मा ३’च्या शूटिंगला सुरुवात Top 10 News:
मराठीतील सुपरहिट ‘झिम्मा’ मालिकेच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच ‘झिम्मा ३’चे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यासोबतच चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे न दाखवता त्यांच्या हातातील विविध पेयांद्वारे वेगळेपण दाखवण्यात आले आहे. ‘यावेळी तिसराच आहे!’ ही टॅगलाईन विशेष चर्चेत आली आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘झिम्मा ३’ हा आधीपेक्षा अधिक मोठा, भन्नाट आणि मनोरंजक प्रवास असणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.





