Top 10 News : राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच , भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली आणि ‘सीजेपी’च्या आंदोलनावर येणार सिनेमा, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच!
पुढचे 24 तास अतिमहत्वाचे
Top 10 News : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ओडिशावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून १०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. बुलढाण्यातही अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘अतिरिक्त कामाचा आरोप तथ्यहीन’
29 कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आहे. दोन शिफ्टमध्ये काम, सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश आणि रिक्त पदांमुळे वाढलेल्या ताणाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंढे यांनी सर्व कामकाज नियमानुसार सुरू असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्याला केवळ 48 तासांचेच काम करून घेतले जाते आणि अतिरिक्त कामाचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली;
दोघांचा मृत्यू ,अनेकजण अडकल्याची भीती
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या नारपोली परिसरात ‘कोहिनूर अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीचा पिलर धोकादायक झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू असतानाच हा प्रकार घडला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अनेक कुटुंबांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले. घटनेनंतर अग्निशमन दल, महापालिका पथक आणि NDRF घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
उल्हासनगरच्या नगरसेवकांची गुवाहाटीवारी भारी!
65 लाखांच्या सहलीवरून संताप
आर्थिक अडचणीत असलेल्या उल्हासनगर महापालिकेने 76 नगरसेवकांसाठी गुवाहाटी येथे 65 लाख रुपयांचा अभ्यास दौरा आयोजित केल्याने वाद निर्माण झाला आहे. 22 ते 26 जुलैदरम्यान झालेल्या या दौऱ्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. एका नगरसेवकावर सुमारे 74 हजार रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जात आहे. शहरात पाणी, रस्ते, सांडपाणी आणि करसंकलनाच्या समस्या असताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही नगरसेवक कुटुंबासह सहभागी झाल्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फुले वाडा-सावित्रीबाई स्मारकाचे काम रखडले;
पुणे महापालिकेवर भुजबळांचा हल्लाबोल Top 10 News :
पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक कॉरिडॉरचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करूनही पुणे महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अनेक बैठका झाल्यानंतरही कामाची प्रगती समाधानकारक नसल्याचे भुजबळ म्हणाले. विद्यार्थ्यांपर्यंत फुले दांपत्याचा इतिहास पोहोचवण्यासाठी आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पेपर माफियांना आता सोडणार नाही’;
विधेयक मंजूर होताच PM मोदींचा सेल्फी व्हिडिओ
पेपरफुटीविरोधी विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ संदेश जारी केला. दोन्ही सभागृहांत सविस्तर चर्चेनंतर कठोर तरतुदींसह विधेयक मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली उभारण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून टास्क फोर्स, फास्ट-ट्रॅक यंत्रणा आणि राज्यांच्या सूचनांचा विचार करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून पेपरफुटी रोखली जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना यापुढे सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
निळी जर्सी गेली, भगवा आला!
भारतीय हॉकीच्या नव्या जर्सीवरून राजकीय वाद पेटला
2026 हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या जर्सीचा रंग पारंपरिक निळ्यावरून भगवा करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हॉकी इंडियाच्या निर्णयाचे काहींनी स्वागत केले असले तरी काँग्रेस खासदार प्रियंका गांधींसह अनेकांनी यावर टीका केली आहे. अनेक माजी खेळाडूंनीही निळी जर्सी ही भारतीय हॉकीची ओळख असल्याचे सांगत निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विरोधकांकडून या निर्णयामागे राजकीय अजेंडा असल्याचा आरोप केला जात असताना, हॉकी इंडियाने हा बदल संघाच्या नव्या ओळखीचा भाग असल्याचे म्हटले आहे.
नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला
६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात बोलबम यात्रेदरम्यान दोन गटांतील वादाचे हिंसाचारात रूपांतर झाल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये तणाव पसरला आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या दगडफेक, जाळपोळ आणि झटापटीत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इनरवा, जनकपूर, सिरहा, गोलबाजार आणि लहानसह अनेक शहरांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संवेदनशील भागांत नेपाळी सैन्य व सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
गोळाफेकीत भारताची निराशा;
तजिंदरपालचे पदक हुकले
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुष गोळाफेक स्पर्धेत भारताच्या तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग यांना पदक जिंकण्यात अपयश आले. तजिंदरपालने 20.27 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह पाचवे, तर समरदीपने 20.03 मीटरच्या प्रयत्नासह सातवे स्थान मिळवले. नायजेरियाच्या चुक्वूएबुका एनेक्वेचीने सुवर्ण, न्यूझीलंडच्या टॉम वॉल्शने रौप्य आणि इंग्लंडच्या स्कॉट लिनकॉल्नने कांस्यपदक पटकावले. दरम्यान, पुरुष तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू अंतिम फेरीत दाखल झाले असून भालाफेकीत नीरज चोप्रासह तीन भारतीयांनी अंतिम फेरी गाठली आहे.
सीजेपीच्या आंदोलनावर आता सिनेमा!
२० कोटी रुपयांचं असणार बजेट Top 10 News :
नीट पेपरफुटीविरोधातील जंतर-मंतर आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांच्या संशोधन आणि पटकथेवर आधारित हा चित्रपट आंदोलनामागील पडद्यामागच्या घडामोडी उलगडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 20 कोटी रुपयांहून अधिक बजेटच्या या फिचर फिल्मची पटकथा अंतिम टप्प्यात असून कलाकार आणि दिग्दर्शकांच्या निवडीसाठी बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता वाढली असून चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.





