Top 10 News : 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई आणि बाबा रामदेव-कंगना यांच्यात वाद, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना आता शासनाकडून मोफत शालेय दप्तर मिळणार आहे. ‘

1 ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार;
राज्य सरकारची मोठी घोषणा
Top 10 News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना आता शासनाकडून मोफत शालेय दप्तर मिळणार आहे. ‘मोफत शालेय दप्तर योजना’ राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. यासाठी 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन ई-निविदेद्वारे दप्तरांची खरेदी केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निविदेचे प्रारूप तयार करून शासनाची मान्यता घेतली जाणार आहे.
मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई;
नियमानुसार कारवाईचे प्रताप सरनाईकांचा इशारा
महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. 20 ऑगस्टपासून मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत सुमारे 1 लाख 65 हजार 600 रिक्षा व टॅक्सी चालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. मराठी न येणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, कोणाचीही रोजीरोटी हिरावण्याचा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्याची भीती होती तेच झालं;
धाराशिवचे १० नगरसेवक बैठकीला गैरहजर
धाराशिवच्या कळंब नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेले नऊ नगरसेवक आणि एक स्वीकृत नगरसेवक, गटनेत्यासह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या नगरसेवकांनी मातोश्रीवरील बैठकीलाही उपस्थिती लावली नव्हती. आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याने धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
फडणवीस-शिंदेमुळेच उपोषणाची वेळ – जरांगे;
29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू होणारे आमरण उपोषण अंतरवाली सराटीतच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मागण्या आणि प्रश्न निकाली न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईकडे रवाना होण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांच्या भूमिकेमुळेच उपोषणाची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत शिंदे आणि शिरसाट यांच्यात मिलीभगत असल्याचा दावा केला. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरूनही जरांगे आक्रमक झाले आहेत.
Jio-Airtel ग्राहकांना झटका? ;
रिचार्ज 15 टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता Top 10 News :
देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना आगामी काळात महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत मोबाइल रिचार्जच्या दरांमध्ये 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 5G नेटवर्क विस्तार, स्पेक्ट्रमवरील खर्च आणि प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने कंपन्या दरवाढ करू शकतात. स्वस्त प्रीपेड प्लान्स बंद केल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार आधीच वाढला आहे. मात्र, जिओ आणि एअरटेलने अद्याप दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
8 दिवसांत साखरेच्या दरात 18 रुपयांची वाढ ;
ग्राहकांना मोठा झटका
सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच ग्राहकांना साखरेच्या वाढत्या दराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळच्या घाऊक बाजारात साखरेचा भाव 18 दिवसांत तब्बल 18 रुपयांनी वाढून 61 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सरकारच्या साठा धोरणामुळे बाजारातील उपलब्धता कमी झाली आहे. तसेच अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिल्याने साखरेचा पुरवठा घटल्याचे सांगितले जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दर वाढले आहेत. या वाढीचा परिणाम सणासुदीतील मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
अमित शाह, विजय यांची गुप्त भेट? ;
महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31व्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची चेन्नईत भेट घेतली. चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे ही बैठक होणार आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आंतरराज्यीय प्रश्न, पाणीवाटप, प्रादेशिक विकास आणि राज्यांमधील समन्वयावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री विजय गोदावरी-कृष्णा-पेन्नार-पलार-कावेरी नदीजोड प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. कावेरी खोऱ्यातील पाणीटंचाई आणि पर्यावरणीय समस्यांवरही तामिळनाडू सरकार भूमिका मांडणार आहे.
ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी;
‘अभूतपूर्व आर्थिक कारवाई करणार’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात अभूतपूर्व आर्थिक कारवाई करण्याची घोषणा केली आहे. ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला करारासाठी अनेक संधी दिल्याचा दावा केला. इराणने त्या संधी गमावल्याचेही त्यांनी म्हटले. इराणला मदत करणाऱ्या देशांतील वित्तीय संस्था, व्यवसाय, विमानतळ आणि सरकारी संस्थांवर गंभीर आर्थिक परिणाम होतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. तेल तस्करी, रोख हस्तांतरण, स्वॅप लाईन्स, एक्सचेंज हाऊसेस आणि बनावट कंपन्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. इराण कधीही अण्वस्त्र बाळगणार नाही, असेही ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले आहे.
हॉकी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी
भारताचा 5-3 असा दणदणीत विजय
हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पूल डीमधील या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर हार्दिक सिंगने एक गोल नोंदवला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने दोन आणि सुफियान खानने एक गोल केला. या विजयासह भारताने पूल डीमध्ये सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले. इंग्लंड अव्वल राहिले, तर पाकिस्तान आणि वेल्सचे स्पर्धेतील आव्हान संपले. भारताचा पुढील सामना 22 ऑगस्टला होणार आहे.
‘मला चारित्र्याचे धडे देऊ नका’-कंगना
बाबा रामदेव-कंगना यांच्यात वाद Top 10 News :
‘गटर जनरेशन’ या वक्तव्यावरून बाबा रामदेव यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार कंगना रणौतने प्रत्युत्तर दिले आहे. रामदेव यांनी कंगनाचे वक्तव्य बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचे म्हटले होते. त्यावर कंगनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे रामदेव यांच्यावर उपरोधिक टीका केली. ‘माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्न पाहू नका,’ असा टोला तिने लगावला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीशी संबंधित प्रकरणात केलेल्या ताशेऱ्यांचा संदर्भ देत कंगनाने रामदेव यांना चारित्र्याबाबत सल्ला देऊ नये, असे म्हटले. तिच्या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





