बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अपडेट ते ट्रम्प यांना फिफाकडून शांतता पुरस्कारपर्यंतच्या टॉप १० बातम्या…

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी फडणवीसांची मोठी घोषणा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. हे स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे. यामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असणार आहे.
माजी आमदार रमेश कदमांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चिती
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झाली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 300 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदमांवर आरोप आहेत. त्यामुळे कदम यांना सत्र न्यायालयानं मोठा झटका दिला आहे.
रमेश कदम आणि महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह एकूण 10 जणांवर आरोप निश्चिती झाली आहे. या सगळ्या आरोपींनी त्यांच्यावरील आरोप नाकारली आहे. याप्रकरणी 2015 मध्ये रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 8 वर्षांनी याप्रकरणी रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला होता.
काँग्रेसची व्यंगचित्राद्वारे राज्यातील प्रमुखावर जहरी टीका
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो साधू-संत आणि तितकेच भाविक भक्त येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र तपोवन येथे साधुग्राम उभारण्यासाठी 1,800 झाडं तोडण्यात येणार असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. या मुद्यावरून काँग्रेसने एका व्यंगचित्रावरून राज्यातील प्रमुखावर टीका केली आहे.
काँग्रेसने हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. या पोस्टमध्ये सगळीकडं बेसुमार वृक्षतोड दाखवण्यात आली आहे. या चित्रात झाडं तोडल्यानंतर त्यांचे बुंधे तेवढे उरलेले दिसतात. तर एका मोठ्या व्यक्तीच्या हातात कुऱ्हाड दाखवली आहे. या व्यक्तीचा चेहरा काँग्रेसने दाखवलेला नाही. मात्र या चित्राच्या वरील भागात ‘झाडखाऊ’ असं लिहिण्यात आलं आहे.
जय पवार आणि ऋतुजा यांचा बहारिनमध्ये विवाहसोहळा संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहारिनमध्ये पार पडला. काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांचं देखील मुंबईतील बीकेसीमध्ये लग्न पार पडलं होतं. त्यानंतर जय पवार यांच्या लग्नानिमित्त पवार आणि पाटील कुटुंब बहारिनला रवाना झालं होतं.
यानंतर आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्नातील फोटो समोर आले आहेत. ज्यात संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत आनंद लुटला. जय पवार यांच्या लग्नाला सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतिभा पवार उपस्थित नव्हते. सुप्रिया सुळेंनी या नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत.
इंडिगोची विमान सेवा कधी पूर्ववत होणार?
गेल्या तीन दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द झाल्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागला आहे. इंडिगोची सेवा कोलमडल्यामुळे देशातील जवळपास सर्वच विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी आहे.
विमान सेवा १० ते १५ डिसेंबर दरम्यान पूर्ववत होईल, असा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी केला आहे. विमान उड्डाणे रद्द होणे आणि विलंबाने संचालन होणे याबाबत समाज माध्यमांवर दिलगिरी व्यक्त करून इंडिगोने रद्द केलेल्या तिकिटांची पूर्ण रक्कम मूळ पेमेंट पद्धतीवर परत केली जाईल, अशी घोषणा केली. इंडिगोच्या या घोळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी समिती करणार आहे.
नर्तिकेची आत्महत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या एका 35 वर्षीय नर्तिकेने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात भाजपशी संबंधित असलेल्या संदीप सुरेश गायकवाड याचे नाव समोर आले आहे. संदीप गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक आहे. तो लग्न करण्यासाठी या महिलेच्या मागे लागला होता आणि त्यासाठीतिच्यावर सतत दबाव आणत होता.
याच दबावापोटी तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? असे सवाल उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
एलॉन मस्क यांच्या ‘X’ला १४० दशलक्ष डॉलर्सचा दंड
युरोपियन युनियनच्या वादग्रस्त कंटेंट-मॉडरेशन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल एलॉन मस्क यांच्या एक्स या सोशल नेटवर्कला १४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. एक्सच्या पेड-फॉर ब्लू टिक चिन्हाने युजर्सची दिशाभूल केली आहे. एक्सने संशोधकांना डेटा देण्यास टाळाटाळ केली आणि जाहिरात-संग्रहाचे व्यवस्थापन करण्यास ते अपयशी ठरले, असे शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. एक्सला या त्रुटी दूर करण्यासाठी आणि यावर उपाय काढण्यासाठी ६० दिवस आणि बदल अंमलात आणण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांना अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो, असे युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाकडून शांतता पुरस्कार प्रदान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकासाठी अनेकदा आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र, ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार मिळाला नाही.
त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाने शांतता पुरस्कार प्रदान केला आहे. ट्रम्प यांना हा नवीन फिफा शांतता पुरस्कार शुक्रवारी २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या ड्रॉमध्ये प्रदान करण्यात आला आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार फिफाचा पहिला शांतता पुरस्कार आहे.
स्मृती मानधनाची पोस्ट; फॅन्सनी व्यक्त केली शंका
भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न स्थगित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. स्मृती मानधना हिनं या सर्व प्रकरणानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. मात्र ही पोस्ट एका टूथपेस्ट ब्रँडसाठी केलेला प्रमोशनल व्हिडीओ आहे.
मात्र नेटकऱ्यांनी स्मृतीच्या बोटात साखरपुड्याची अंगठी नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. काही फॅन्सच्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ लग्नाच्या अगोदरचा आहे. अद्याप त्रि स्मृती मानधनानं लग्नासंदर्भात कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही आणि हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे देखील स्पष्ट केलेलं नाही. मात्र, या पोस्टनंतर यूजर्सकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.
सुहाना खाननं रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी शेअर केली पोस्ट
बॉलिवूडच्या ‘किंग’ शाहरुख खानची लेक सुहाना खानने ‘द आर्चिज’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. सध्या सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. सुहाना खान हिचं नाव बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत जोडलं जात. ‘द आर्चिज’ सिनेमात दोघे एकत्र झळकले होते. तेव्हापासून सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या अफेअरची चर्चा रंगलेल्या आहेत.
आता सुहाना खाननं रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा याच्यासाठी खास स्टोरी शेअर केली. अगस्त्य नंदाचा चित्रपट ‘इक्कीस’ येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘सितारे’ गाणे सुहानानं तिच्या सोशल मीडिया स्टोरीजवर शेअर करत चित्रपटाला पाठिंबा दिला.
हेही वाचा:





