Top 10 News : मोशी दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई , ‘लाडक्या भावा’कडून रक्कम वसूल होणार आणि मराठी अभिनेत्याचे इंडस्ट्रीत ७० बुडाले , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशी दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई
कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Top 10 News : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून, गुप्ता यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले होते. एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जयंत पाटलांना आणखी धक्का;
ईश्वरपूरचे नगरसेवक सुनील मलगुंडे अपात्र
सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे बंधू आणि नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनाही याच कारणावरून अपात्र करण्यात आले होते. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना हा आणखी एक राजकीय धक्का मानला जात आहे. आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी पोटनिवडणूक होणार असून ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
लाडक्या भावाकडून रक्कम वसूल होणार;
योजनेचे पैसे घेणाऱ्यांना तटकरेंचा इशारा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरलाभ घेणाऱ्या पुरुषांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अशा लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शासकीय कर्मचारी, जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि एकाच कुटुंबातील अतिरिक्त लाभार्थी अशा लाखो जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून अद्याप 62 लाख महिलांनी ती पूर्ण केलेली नाही.
भेसळीविरोधात जनआंदोलन उभारा;
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन
राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. भेसळ रोखण्यासाठी केवळ सरकारी कारवाई पुरेशी नसून महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून जनआंदोलन उभं करावं असं त्यांनी म्हटलंय. चांगल्या दर्जाचे अन्न निवडण्याची सवय लावावी आणि समाजाकडे कुटुंब म्हणून पाहून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे, असेही मुंढे यांनी सांगितले. भेसळखोरांविरोधातील कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र;
चार दिवसांत राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार
राज्यातील पावसाने गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी पुढील काही दिवसांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम 18 ते 19 जुलैनंतर कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर दिसू शकतो. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. वातावरणातील बदलामुळे काही भागांत मुसळधार, तर स्थानिक पातळीवर ढगफुटीसदृश पावसाचीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इथेनॉल-E20 बाबत दिशाभूल केल्याचा आरोप;
4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल आणि E20 पेट्रोल धोरणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीष कश्यप, देसी बॉयसर, हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे यांचा यात समावेश आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. गडकरी यांच्या धोरणाचा चुकीचा संदर्भ देत भ्रामक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहार;
निलंबित कर्मचारी अटकेत
उत्तराखंडातील बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहारप्रकरणी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या (बीकेटीसी) निलंबित कर्मचारी प्रमोद नौटियाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मंदिरातील देणगीतील रोकड आणि काही वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी 8 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेवरून उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आरोपीची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
होर्मुझवर अमेरिकेच्या नियंत्रणाचे ट्रम्प यांचे संकेत
सुरक्षा शुल्काचा प्रस्ताव
युद्धविरामानंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा वाढला असून इराणने ‘कोड 009’ मिशनअंतर्गत काही आखाती देशांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर प्रतिहल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका घेण्याचे संकेत देत कार्गो जहाजांवर 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि गॅसची वाहतूक होर्मुझमार्गे होत असल्याने या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजार आणि आखाती प्रदेशातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत-इंग्लंड पहिल्या वनडेला पावसाचा धोका?
मात्र पूर्ण 50 षटकांचा सामना होण्याची शक्यता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (14 जुलै) बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने यावेळीही हवामानाकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अॅक्युवेदरच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान केवळ 1 टक्के पावसाची शक्यता असून पूर्ण 50 षटकांचा सामना होण्याची अपेक्षा आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
‘माझे इंडस्ट्रीत 70 लाख रुपये बुडाले’;
अभिनेते कमलेश सावंत यांचा धक्कादायक खुलासा Top 10 News :
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमलेश सावंत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील मोठा आर्थिक फटका उघड केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी, विविध निर्मात्यांकडे मिळून आपले तब्बल 70 लाख रुपये अडकले असून ते परत मिळाले नसल्याचे सांगितले. पैसे मागण्यासाठी आपण वारंवार तगादा लावत नसल्याने हे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, दिवंगत निर्माता केशू रामसे यांच्या मुलाने वडिलांचे थकीत मानधन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, “माझा व्यवहार तुमच्या वडिलांशी होता, तुमच्याशी नाही,” असे सांगत त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिल्याचाही किस्सा त्यांनी सांगितला.




