TOP 10 NEWS: श्रीमंत योगी…!! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा ते इंधन टंचाईच्या संकटात भारताला दिलासा; जाणून घ्या आजच्या TOP 10 News
TOP 10 NEWS: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील राजकीय घडामोड...

TOP 10 NEWS: 1. श्रीमंत योगी…!!! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिणामी किल्ले रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून अवघा रायगड महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला आहे. राज सदरेवरील मेघडंबरीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
भगवे झेंडे, पताका, पोवाडे आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झालं आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून शिवभक्त दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर दाखल झाले आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक निघेल. तर शिवसमाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
2. मनोज जरांगेंनी मानले फडणविसांचे आभार
राज्य सरकार मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचेही आभार मानले आहे.
राज्य सरकारने जी भूमिका हातात घेतली आंतरवालीच आंदोलन झाल्यापासून घेतली आहे. त्यांची भूमिका खरंच चांगली आहे. त्यांना गोरगरीब मराठ्यांची मन जिंकता येत आहेत गोरगरीब मराठ्यांच्या मनावर राज्य करता येत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष करून विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी यांनी सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय देण्याचे ठरवलं आहे याचे मी मनापासून आभार मानतो, असे जरांगे म्हणाले. तसेच आता ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्या योजना बंद होऊ देऊ नका एवढेच बारकाईने लक्ष ठेवा, अशी विनंतीही जरांगे यांनी केली.
3. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर!
मान्सून 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला असून, नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम मध्यावर आहे. 5 जूनला गोवा, कर्नाटकातील काही भाग तसेच तमिळनाडू या राज्यांमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने वर्तवलं. पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात वेगाने आगेकूच करत आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 5 ते 11 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग व संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात कोकण गुवा मध्य महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.
4. फुले वाड्यात यंदा वटसावित्री पूजेला बंदी
पुण्यातील फुले वाड्यात यंदा वटसावित्री पूजेला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे गंजपेठेच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असणाऱ्या महिलांना फुले वाड्यात यंदा वटसावित्री पूजेला जाता येणार नाही. महात्मा फुले यांचे वंशज प्रशांत फुले यांनी सरकारकडे फुले वाड्यात वटसावित्री पूजेला बंदी घालण्यात यावी, अशी याचिका केली होती.
प्रशांत फुले यांनी मांडलेल्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य आणि संविधानिक नियम राखण्यासाठी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले. गेल्या वर्षी वटपौर्णिमेला महिला, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये होता मोठा वाद झाला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. मागील वर्षी झालेल्या राड्यानंतर यावेळी खबरदारी घेत फुले वाड्यात धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालती. पुरातत्त्व विभागाने परिपत्रक जारी करीत संबंधित निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. TOP 10 NEWS
5. केस कटिंग, दाढी करणे महागले !
महागाईचा मोठा फटका आता सलून व्यवसायालाही बसला आहे. वाढते इंधनाचे दर, महाग झालेली आंतरराष्ट्रीय व स्थानिक सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्च यामुळे ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळाने’ सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नाभिक महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ही नवीन दरवाढ 6 जूनपासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.
शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सलून व्यावसायिकांवरील आर्थिक ताण कमालीचा वाढला होता. या वाढत्या महागाईत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा दरवाढ करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होतं, असं स्पष्टीकरण नाभिक महामंडळाकडून देण्यात आलंय. या दरवाढीमुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल आणि इतर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सलून सेवांसाठी ग्राहकांना आपल्या खिशातील अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
6. अभिजित दिपके अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल
सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चा संस्थापक अभिजित दिपके शनिवारी सकाळी ७:४५ वाजता अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झाला आहेत. तो दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. दिल्लीत उतरताच अभिजित दिपके जंतर-मंतरवर आंदोलनाची अधिकृत परवानगी घेण्यासाठी पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे रवाना झाला. त्याने आपल्या समर्थकांनाही पोलीस स्टेशनबाहेर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
नीट आणि अन्य परिक्षांवरुन झालेल्या गोंधळावरुन कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजकीय पार्टी म्हणून या पार्टीची नोंदणी करण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे. दरम्यान, आंदोलनासाठी ‘CJP’ कडून अद्याप कोणताही अधिकृत अर्ज आलेला नाही. तरीही, सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत १,००० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
7. इंधन टंचाईच्या संकटात भारताला दिलासा
अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. एकीकडे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर इंधन टंचाईचं संकट उभं राहिले असताना ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. ऑइल इंडिया लिमिटेड ने अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा नवा शोध लावला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.
यापूर्वी 2025 मध्ये श्री विजयापुरम-2 विहिरीतही गॅसचा शोध लागला होता. त्यात 87 टक्के मिथेन आढळला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचा मानला जातो. या दोन्ही विहिरींमधील यशस्वी शोधांमुळे अंदमान बेसिनला ‘ऊर्जेचे महासागर’ म्हणून ओळखले जात आहे. दरम्यान, हे संशोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समुद्र मंथन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश खोल समुद्री भागातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेणे हा आहे.
8. ‘तो’ प्रश्न अन् लंडनमध्ये सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमात गोंधळ
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडनमधील कार्यक्रमात एका व्यक्तीने गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. लंडनच्या प्रसिद्ध बर्कबेक युनिव्हर्सिटीमध्ये गुरुवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. मात्र प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू असतानाच एका महिलेने कार्यक्रमात अडथळा आणण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एका महिलेने तंत्रज्ञानाचा विषय सोडून भारतातील ‘मतांतरे आणि वाढती असहिष्णुता’ या राजकीय मुद्द्यावरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि यावरून सभागृहात अचानक आरडाओरडा सुरु झाला.
मात्र, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने तातडीने मध्यस्थी करत तो प्रश्न रोखला. हा प्रश्न कार्यक्रमाच्या मूळ विषयाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी वातावरण शांत केले.यानंतर भारतीय उच्चायोगाने, लोकतांत्रिक समाजात विचारांची भिन्नता असणे स्वाभाविक आहे. परंतु, ती नेहमी एका सभ्य आणि सन्मानजनक मार्गाने मांडली गेली पाहिजे. अशा आंतरराष्ट्रीय मंचावर प्रेक्षकांचे हे उद्धट वर्तन सार्वजनिक संवादाच्या मर्यादांच्या विरोधात असून ते अस्वीकार्य असल्याचे सोशल मीडियावर एक अधिकृत पत्रक जारी करत म्हंटले. TOP 10 NEWS
9. आधी क्रिकेट अन् आता थेट भालाफेक स्पर्धेमध्ये रचला इतिहास
रोम डायमंड लीगमध्ये श्रीलंकेचा भालाफेकपटू रुमेश थरंगा पथिरागे याने विक्रम केला आहे. रुमेशने रोममध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगमध्ये 92.62 मीटर लांब भाला फेकला आणि नीरज चोप्राचा रेकॉर्ड मोडला. डायमंड लीगच्या या सिझनमध्ये 90 मीटरपेक्षा लांब भाला फेकणारा थरंगा पहिलाच खेळाडू आहे. दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने केलेला रेकॉर्ड थरंगाने मोडला आहे. पण पाकिस्तानच्या अरशद नदीमचा रेकॉर्ड मात्र थरंगाला मोडता आला नाही. रुमेश थरंगा सगळ्यात लांब भाला फेकणारा आशियातला दुसरा खेळाडू तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आठवा खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे, रुमेश थरंगा पथिरागे हा अंडर-18 क्रिकेटमध्ये सध्या इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असलेल्या इशान मलिंगासोबत खेळत होता, पण यानंतर त्याने भालाफेककडे लक्ष केंद्रीत केलं.
10 . परदेशातही सुबोधची ‘वीण दोघांतली ही तुटेना’
अभिनेता सुबोध भावे सध्या परदेशात कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेला आहे. मात्र स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवरूनच चक्क आपल्या मुलांच्या मदतीनंत्याने ‘वीण दोघांचेही तुटेना’ मालिकेचं शूटिंग सुरू ठेवलं आहे. तो तिथून एकट्याचे छोटे-छोटे प्रसंग चित्रित करून मुंबईत मालिकेच्या टीमला पाठवतोय. यासाठी त्याला मदत करत आहेत त्याची दोन्ही मुलं. सुबोधची मुलं कान्हा आणि मल्हार सहकार्य करत आहेत. कान्हा शूट करतोय, तर मल्हार ‘क्यू’ देण्यासाठी समोरच्या व्यक्तिरेखेचे संवाद म्हणतोय. तर सुबोधची पत्नी मंजिरीसुद्धा या सगळ्याला हातभार लावतेय.
हा व्हिडिओ शेअर करत सुबोधने लिहिलं की, परदेशात असतानाही ‘वीण’ काही तुटत नाही. कुटुंबियांसमवेत फिरायला आलोय पण काम थांबता कामा नये. समरची मिशी बरोबर घेऊन फिरतोय, सीन आला की जागा बघून शूट करून पाठवतोय. मदतीला माझी दोन्ही मुलं! कान्हा शूट करतोय आणि मल्हार समोरच्याची वाक्यं म्हणतोय.” यासोबतच ही मालिका सुबोधची पत्नी मंजिरी भावे निर्मित करत असल्यानं त्यानं पुढं “आता स्वतः निर्मात्याच्या भूमिकेत असल्यामुळं आमचे मालक हे सगळं समजून घेत आहेत,” असे विनोदी शैलीत लिहिले आहे.
हेही वाचा:
Salon Rate Hike : महागाईचा ‘हेअरकट’! महाराष्ट्रात सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली






