Salon Rate Hike : महागाईचा ‘हेअरकट’! महाराष्ट्रात सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली
Salon Rate Hike : या निर्णयामुळे केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल तसेच इतर आधुनिक सलून सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Salon Rate Hike : देशातील वाढत्या महागाईचा फटका आता सलून व्यवसायालाही बसू लागला आहे. वाढते इंधन दर, महाग झालेली स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्यप्रसाधने तसेच व्यवसाय चालवण्याचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ 6 जूनपासून राज्यभर लागू करण्यात आली आहे.
नाभिक महामंडळाच्या म्हणण्यानुसार, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय टिकवून ठेवणे आणि सलून कारागिरांचा उदरनिर्वाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी दरवाढ अपरिहार्य झाली होती. अनेक वर्षांपासून कमी नफ्यात सेवा देणाऱ्या सलून व्यावसायिकांना आता वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
या निर्णयामुळे केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल तसेच इतर आधुनिक सलून सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हेही वाचा : Shirur Bazar Samiti : शिरूर बाजार समितीत विक्रमी अर्ज! १८ जागांसाठी तब्बल ३०० उमेदवारांची उडी
याशिवाय वाढलेली वीजबिले, दुकानभाडे, स्थानिक कर आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच राज्यभरात सलून सेवांच्या दरात 20 टक्के वाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार असून त्यांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
वाढत्या महागाईच्या अस्मानी संकटामध्ये सलून व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी आणि दुकानदारांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी दरांमध्ये ही 20 टक्के वाढ करणे अपरिहार्य होते, असे नाभिक महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी या परिस्थितीचा विचार करून सहकार्य करावं, असं आवाहन देखील महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ही दरवाढ प्रिमियम सलून, एसी सलून आणि ग्रामीण भागातील सलूननुसार आधीच्या दरांपेक्षा 20 टक्के अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.
हेही वाचा : Tree Fall Incident : महामार्गावर कोसळलं महाकाय झाड! रुग्णवाहिकांसह शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली





