Top 10 News : राज्यात मुसळधार ते उद्या महाराष्ट्र बंदची हाक..; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या
Top 10 News : राज्यात मुसळधार ते उद्या महाराष्ट्र बंदची हाक..; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या

Top 10 News : 01) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 21 ते 26 जुलैदरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचाही अंदाज आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. (Top 10 News)
02) शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची घोषणा करत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार असल्याचे सांगितलेय. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर सरकारने कर्जमाफी प्रक्रियेला गती दिली असून, उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीतील पात्र शेतकऱ्यांची पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, रक्कम खात्यात जमा होण्याची अचूक तारीख अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अधिकृत यादी आणि पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
03) वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलेय. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, अहिल्यानगरमध्ये विविध आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. आंदोलनामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. (Top 10 News)
04) आंदोलकांना ‘आतंकवादी’ म्हणत सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनावर भाष्य करताना शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना ‘आतंकवादी’ अशी उपमा दिल्याने नवा वाद निर्माण झालाय. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई सुरू असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांचा राजीनामा घेऊ नये, असे त्यांनी म्हटले. आंदोलनाच्या माध्यमातून काही राजकीय पक्ष वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सरकारने अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, असे आवाहनही खोत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलकांना ‘आतंकवादी’ संबोधल्याबद्दल विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. (Top 10 News)
05) शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजीत दिपकेंची घेतली भेट
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी दिपकेंनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि सोनम वांगचुक यांची सुटका अशा प्रमुख मागण्या पवारांसमोर मांडल्या. त्यावर शरद पवार यांनी आंदोलन किती दिवस सुरू ठेवणार आणि कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, याबाबत चर्चा केली. दरम्यान, या आंदोलनाला विविध विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, काँग्रेससह इतर पक्षांनीही केंद्र सरकारविरोधात आंदोलन अधिक तीव्र केलेय. (Top 10 News)
06) ‘मला अर्धाच पगार द्या’; IAS अधिकाऱ्याच्या पत्राने प्रशासनात खळबळ
उत्तर प्रदेशातील 2023 बॅचचे IAS अधिकारी रिंकू सिंह राही यांनी सरकारला लिहिलेल्या पाच पानी पत्रामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय. सध्या जालौन येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राही यांनी, दिवसभरात केवळ चार तासांचेच काम मिळत असल्याने पूर्ण पगाराऐवजी अर्धा पगार द्यावा, अशी मागणी केलीय. तसेच नियमांनुसार पूर्णवेळ काम करता येईल अशा ठिकाणी बदली करण्याची विनंतीही त्यांनी केलीय. पत्रात त्यांनी राजकीय दबाव, भ्रष्टाचार आणि चौकशीवर प्रभाव टाकण्याचे गंभीर आरोपही केलेत. अत्यंत गरीब कुटुंबातून UPSC उत्तीर्ण होऊन IAS बनलेल्या रिंकू सिंह राही यांच्या या पत्रानंतर सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
07) ट्रम्प यांचा इराणला इशारा; युद्ध तीव्र, जागतिक चिंता वाढली
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून तणावामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढलीय. इराणच्या हल्ल्यात अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला “याची मोठी किंमत मोजावी लागेल” असा इशारा दिलाय. दरम्यान, दोन्ही बाजूंनी हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्याने परिस्थिती अधिक चिघळत आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव कायम असल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम होत आहे. मात्र, या घडामोडींतील अनेक दावे संबंधित पक्षांकडून केले जात असून त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. युद्धविरामाच्या चर्चांदरम्यानही संघर्ष सुरू असल्याने मध्यपूर्वेतील परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
08) iPhone 18 Pro च्या 3 मोठ्या बदलांमुळे युजर्स नाराज, फोन होणार आणखी वजनदार?
Apple च्या आगामी iPhone 18 Pro संदर्भातील लीकमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. अहवालांनुसार, नवीन प्रो मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक जाड आणि वजनदार असू शकते. तसेच, अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेला ब्लॅक कलर पर्याय यावेळी उपलब्ध नसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मोठी बॅटरी आणि अधिक प्रगत कॅमेरा सेन्सरसाठी फोनची जाडी व वजन वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, या सर्व माहितीला Apple कडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे हे बदल सध्या केवळ लीक्स आणि अफवांवर आधारित आहेत. फोनचे अंतिम डिझाइन आणि फीचर्स अधिकृत लॉन्च कार्यक्रमातच स्पष्ट होणार आहेत. (Top 10 News)
09) जॉन अब्राहमने 84 कोटींचा आलिशान बंगला केला खरेदी
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात तब्बल ₹84 कोटींचा आलिशान बंगला खरेदी केलाय. 14 जुलै 2026 रोजी पूर्ण झालेल्या या व्यवहारात सुमारे 1,017 चौरस मीटरचा प्लॉट, आउटहाऊस आणि प्रशस्त बंगला समाविष्ट आहे. या खरेदीसाठी जॉनने ₹5 कोटी मुद्रांक शुल्क आणि ₹30 हजार नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर आलीय. वांद्रे पश्चिम हा परिसर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींच्या आलिशान निवासस्थानांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, जॉनकडे मुंबईसह परदेशातही अनेक महागड्या मालमत्ता आहेत. कामाच्या आघाडीवर तो लवकरच राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि ‘फोर्स 3’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Top 10 News)
10) “विराट-रोहितला पाठिंबा द्या नाहीतर स्पष्ट सांगा”, युवराज सिंगचा BCCI ला इशारा
भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या भवितव्याबाबत बीसीसीआय, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी आक्रमक मागणी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने केलीय. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हे दोघे भारताच्या भविष्यातील योजनांचा भाग आहेत की नाही, याबाबत त्यांना अंधारात न ठेवता समोरासमोर स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली असल्याचे युवराजने ठामपणे मांडलेय. रोहित आणि विराट यांच्या निवृत्ती आणि भवितव्याभोवती सध्या निर्माण झालेली अनिश्चितता पाहून त्याला स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांची आठवण झाल्याची खंतही त्याने व्यक्त केलीय. (Top 10 News)





