Top 10 News : राज्यात धो-धो कोसळणार ते ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : राज्यात धो-धो कोसळणार ते ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) राज्यात वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार; 28 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने 28 जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा अलर्ट जारी केलाय. घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. काही भागांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आलाय. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्येही रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
2) खलील शेख मृत्यू प्रकरणात रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल; अटकपूर्व जामिनासाठी धाव
बांधकाम व्यावसायिक खलील शेख मृत्यू प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही नॉट रिचेबल असून अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आलीय. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. खलील शेख यांनी केलेल्या व्हिडिओत धंगेकर दाम्पत्यासह 14 जणांना जबाबदार धरले होते. कामाचे पैसे न मिळाल्याने आणि आर्थिक तणावामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. (Top 10 News)
3) राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर माकडांचा धुमाकूळ; पोलिस, अग्निशमन दलाची धाव
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी माकडांचा कळप घुसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माकडे घराच्या बाल्कनीत आणि विविध भागांत फिरू लागल्याने कुटुंबीय व सुरक्षा कर्मचारी घाबरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात धाव घेत अग्निशमन दलाची मदत मागवली. संयुक्त पथकाने माकडांना कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. शिवाजी पार्क परिसरात पहाटेपासून माकडांचा वावर असल्याने स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून माकडांच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे. (Top 10 News)
4) फेसबुकवर ‘रशियन’ महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट; 56 वर्षीय व्यक्तीला 7 लाखांचा गंडा
नालासोपाऱ्यात फेसबुकवरील ‘रशियन’ महिलेच्या नावाने एका 56 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7 लाख 38 हजार 500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. आरोपी महिलेने गोड बोलून विश्वास संपादन केला आणि आपण दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाच्या ताब्यात अडकल्याचे सांगत आर्थिक मदतीची मागणी केली. पैसे परत करण्याचे आश्वासन देत तिने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लाखो रुपये जमा करून घेतले. रक्कम मिळताच आरोपीने फोन आणि सोशल मीडिया अकाउंट बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. (Top 10 News)
5) शाईफेक करणाऱ्या महिलेचे अभिजीत दीपकेवर गंभीर आरोप
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक करणाऱ्या बरखा त्रेहन यांनी घटनेनंतर आपली भूमिका स्पष्ट केलीय. आंदोलन राजकीय हेतूने चालवले जात असल्याचा आरोप करत, भगवान श्रीराम आणि माता सीतेबाबत कथित अवमानकारक वक्तव्यांचा निषेध म्हणून शाईफेक केल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच दीपके आणि त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला मारहाण झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. केस ओढणे, छातीला स्पर्श करणे, हात-पायांना दुखापत झाल्याचा दावा करत, पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर जीवाला धोका निर्माण झाला असता, असे त्या म्हणाल्या. बरखा त्रेहन या स्वतःला पुरुष हक्क कार्यकर्त्या आणि ‘पुरुष आयोग’च्या अध्यक्षा म्हणून ओळख देतात. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Top 10 News)
6) जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून दरहाली नदीला पूर आल्याने अनेक भाग जलमय झाले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर अनेक घरांचेही नुकसान झालेय. बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने माता वैष्णो देवी आणि बाबा अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलीय. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केलेय. (Top 10 News)
7) ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून, आणखी 18 हजार भारतीयांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. डिपोर्टेशनसाठी सैन्य विमानांचा वापर करण्याचीही तयारी सुरू आहे. एल पासो आणि कॅलिफोर्नियामध्ये नवीन डिटेंशन सेंटर्स उभारण्यात आली असून, हजारो भारतीय तेथे ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. इमिग्रेशन अटर्नींच्या मते, अनेकांना अपील, सुनावणी किंवा वकिलाची संधी न देता थेट डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जात आहे. 2025 मध्ये अमेरिकेने 3,567 भारतीयांना, तर 2026 मध्ये जूनपर्यंत 1,076 भारतीयांना डिपोर्ट केले आहे. 2025 मधील पहिल्या कारवाईत 104 भारतीयांना लष्करी विमानाने अमृतसरला पाठवण्यात आले होते. (Top 10 News)
8) भारतात Yamaha XSR155 लाँच; रेट्रो लूक, दमदार फीचर्स आणि आकर्षक किंमत
यामाहा मोटर इंडियाने भारतात बहुप्रतीक्षित Yamaha XSR155 मोटरसायकल अधिकृतपणे लाँच केलीय. आधुनिक रेट्रो डिझाइन असलेल्या या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,49,990 रुपये ठेवण्यात आलीय. XSR155 मध्ये 155cc लिक्विड-कूल्ड VVA इंजिन, 13.5 kW पॉवर, 14.2 Nm टॉर्क, 6-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच, ड्युअल-चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि USD फ्रंट फोर्क्ससारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. ही बाईक चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच यामाहाने AEROX-E आणि EC-06 हे दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स तसेच FZ-RAVE ही नवी मोटरसायकलही सादर केली. प्रीमियम आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात उपस्थिती मजबूत करण्याचा कंपनीचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे. (Top 10 News)
9) ‘बॉर्डर 2’नंतर अहान शेट्टीची हॉरर विश्वात एन्ट्री; ‘1920’च्या नव्या भागात झळकणार
‘बॉर्डर 2’मधील अभिनयामुळे चर्चेत आलेला अभिनेता अहान शेट्टी आता हॉरर चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘1920: विंटर इज कमिंग’ या आगामी चित्रपटात अहान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आनंद पंडित निर्मित या चित्रपटाचे अंदाजे बजेट 14 कोटी रुपये असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये शिमला येथे चित्रीकरण होणार आहे. चित्रपटासाठी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीची निवड सुरू आहे. अहानने 2021 मध्ये ‘तडप’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तर ‘बॉर्डर 2’नंतर त्याच्या कारकिर्दीला वेग मिळाला आहे. ‘1920’ फ्रँचायझीचा हा नवा भाग प्रेक्षकांसाठी भय आणि थराराचा नवा अनुभव ठरणार असल्याची चर्चा आहे. (Top 10 News)
10) रोहित-विराटच्या निवृत्तीच्या वादात कपिल देव यांची एन्ट्री; कोणाचेही स्थान पक्के नसल्याचे विधान!
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर १९८३ चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. कपिल देव यांच्या मते, क्रिकेटमध्ये रोहित किंवा विराटसारख्या दिग्गजांचे स्थानही कधी ‘कायमस्वरूपी’ असू शकत नाही, परंतु जोपर्यंत ते चांगली कामगिरी करत आहेत, तोपर्यंत त्यांना संधी मिळाली पाहिजे. सचिन तेंडुलकरचा दाखला देत ते म्हणाले की, रोहित आता २० वर्षांचा राहिला नसून ४० वर्षांचा होत आला आहे एकेदिवशी सर्वांनाच निवृत्ती घ्यावी लागते. खेळाडूचे वय किंवा उंची न बघता, निवड समितीने केवळ भारताला विजय मिळवून देणारी सर्वोत्तम टीम निवडावी. (Top 10 News)





