Top 10 News : जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण ते नेपाळचा आंतरराष्ट्रीय मदतीला नकार; जाणून घ्या आजच्या Top 10 News…
Top 10 News : राज्य, देश- विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील राजकीय घडामोडी...

Top 10 News : १. मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज, शनिवारपासून (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द, जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय घेऊन ते अंतरवाली सराटीत उपोषणाला बसत आहेत. शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्याची मागणी जरांगे यांनी केलीय. यासाठी त्यांनी सरकारला 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.
मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यानं जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आज जरांगेंची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारने मागण्या मान्य न केल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला
२. महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता कमी
राज्यात आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाचा मोठा इशारा नाही. तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील ४-५ दिवस हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे.
तर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मध्य भारत, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस थोडा वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा भागात पाऊस सुधारू शकतो. मात्र १० ते २४ सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
३. समृद्धी महामार्गावर टायर पंक्चर करून लाखो रुपयांची लूट
समृद्धी महामार्गावर लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत लाखो रूपयांची लूटमार केल्याची घटना घडली आहे. तीन वाहनांना लुटारूंनी लक्ष्य केल्याची माहिती असून त्यात छत्रपती संभाजीनगरच्या वकिलाच्या कुटुंबीयाला मारहाण करत सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. त्याची तक्रार वावी पोलिसात दाखल झाली असून या घटनेने पोलिस यंत्रणाही अलर्ट झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ३८ वर्षीय वकील कुटुंबीयांसह मारुती सुझुकी कारने मुंबईकडे जात असताना गुरूवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लोखंडी वस्तू आदळून त्यांच्या गाडीचे टायर फुटले त्यानंतर गाडी थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या लुटारूंच्या टोळक्याने गाडीला घेराव घालत लोखंडी रॉड व दांडक्यांनी मारहाण केली.
लुटारूंनी वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताच, घाबरलेल्या कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे व रोख ८४ हजार ५०० असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारूंना दिला. त्यानंतर एका हिंगोलीतील वाहनाच्या बाबतीतही दगडफेक करत असाच लुटीचा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
४. हजारो SIR फॉर्म चक्क झेरॉक्स दुकानात; बीएलओंवर निलंबनाची कारवाई
पनवेल मतदारसंघात हजारो SIR फॉर्म एका झेरॉक्स दुकानात आढळून आले आहेत. उद्धव सेनेचे खारघर विभाग प्रमुख बालेश भोजने दुकानात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित झेरॉक्स सेंटरवर जाऊन तपासणी केली. त्यावेळी सूरज पाटील यांच्याकडे ३ हजार ४०० गणनापत्रे झेरॉक्ससाठी आणल्याचे निष्पन्न झाले. एकूण ११ मतदान केंद्रांवरचे गणनापत्रे त्यात आढळले.
याबाबत खारघर पोलिस ठाण्यात झेरॉक्स दुकान मालक सूरज पाटील यांच्या विरोधात भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित झेरॉक्स दुकान मालकावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ५ बीएलओंवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाचीही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
५. ‘जरांगेंना भाव देत नाही’ विजय वडेट्टीवारांची टीका
काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मी जरांगेंना फारसं महत्त्व किंवा भाव देत नाही. जरांगे यांनी सरकारचे कपडे उतरावावेत आणि सरकारने जरांगेचे कपडे उतरवावेत. त्यांनी एकमेकांशी काय लढावं, याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही,’ असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
तसेच ओबीसींच्या वाटचं घेऊ नये, ज्याप्रमाणे EWS साठी आरक्षण १० टक्क्यांनी वाढवून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली, त्याचप्रमाणे गरज असल्यास आणखी १० ते २० टक्के आरक्षण वाढवून दिले पाहिजे. जरांगेंच्या नादाला कुणी लागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु ओबीसींच्या नादाला कुणीही लागू नये, हा आमचा स्पष्ट इशारा आहे. याशिवाय ओबीसी प्रमाणपत्र असलेले खूप मराठा नेते आहेत. मात्र, आता बोलणे योग्य नाही, सध्या वातावरण गरम असल्याने ते थंड होऊ द्या सगळ्यांची नावे देतो, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
६. राजकीय उलथापालथ सुरूच! महिन्याभरातच मंत्र्याने दिला राजीनामा
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला महिना होत नाहीत तोपर्यंत सरकारमधील मंत्री बी. नागेंद्र यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनूसुचित जाती विकास मंडळातील घोटाळ्या प्रकरणी होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागेंद्र यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याची घोषणा करताना बी. नागेंद्र यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, वाल्मिकी मंडळातील कुठल्याही देवणा-घेवाणीवर माझ्या कुठे स्वाक्षऱ्या आहेत का? मी केवळ दलित असल्याने मला लक्ष्य केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
७. दिल्लीहून परतताच टार्गेट; भाजपचे आमदाराच्या घरावर ग्रेनेड हल्ला
मणिपूरमध्ये भाजपचे आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री अचानक ग्रेनेड (बॉम्ब) स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. आमदार डॉ. सपम रंजन सिंह हे घटनेच्या आदल्या दिवशीच दिल्लीहून परतले होते.
मणिपूरमधील परिस्थितीबाबत त्यांनी दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीहून परतताच काही तासांतच त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी स्वतः आमदारांच्या घरी भेट देऊन पाहणी केली आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, या स्फोटामागे नक्की कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
८ . संकटादरम्यान नेपाळचा आंतरराष्ट्रीय मदतीला नकार; कारणही सांगितलं…
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत आलेल्या आपत्तींमुळे देशातील ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. पुरामुळे बचावकार्य सुरू आहे, पण नेपाळ सरकारने चीन आणि अमेरिकेसह अनेक देशांकडून मिळणारी मदत स्पष्टपणे नाकारली आहे. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा यंत्रणा मदत आणि बचाव कार्य करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा दावा नेपाळ सरकारने केला आहे.
नेपाळने २०१५ च्या भूकंपातील आपला अनुभव सांगून ही मदत स्वीकारण्यास नकार दिला. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१५ च्या भूकंपानंतर जगभरातून आलेल्या आंतरराष्ट्रीय पथकांमुळे, लष्करी विमानांमुळे आणि मदत संस्थांमुळे काठमांडू विमानतळ आणि प्रशासकीय यंत्रणेवर भार पडला होता. परदेशी पथकांमधील समन्वयाचा आणि स्पर्धेचा अभाव यामुळे संकट कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढले. हाच जुना अनुभव विचारात घेत, गोंधळ टाळण्यासाठी नेपाळने यावेळी स्वदेशी यंत्रणांच्या माध्यमातूनच बचावकार्य राबवण्यावर भर दिला आहे.
९ . श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?
श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष पुढील मालिकांकडे लागले आहे. सप्टेंबर महिन्यात टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होणार असून, याच कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघाचा सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
विशेष म्हणजे या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. त्यानंतर दुसरी टी-20 मॅच 15 सप्टेंबर 2026 रोजी आणि तिसरी टी-20 मॅच 17 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
१०. संगीतकार अमाल मलिकचा म्युझिक इंडस्ट्रीतून ब्रेक
संगीतकार अमाल मलिक ‘बिग बॉस १९’मुळे प्रसिद्धीच्या झोतात होता. मात्र आता त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमालने संगीतापासून काही काळ ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. अमाल मलिकने त्याच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली.
या पोस्टमध्ये त्याने, ‘मन, शरीर आणि आत्मा या सर्वांना पूर्णपणे सावरण्यासाठी मला एका विश्रांतीची गरज आहे. मला पुढे जायचे आहे, पुन्हा भरारी घ्यायची आहे आणि लवकरच भरपूर संगीतासह तुमच्यासारख्या प्रिय अमालियन्सकडे परत यायचे आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी संगीत देणार नाही. मात्र, जुन्या आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांमधील गाणी कदाचित लवकरच रिलीज होऊ शकतात. अर्थात, ते चित्रपट प्रदर्शित झाले तरच. संगीतापासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास मला खूप दूर घेऊन गेला. आता मी पुन्हा संगीताकडे वळत आहे. तूर्तास मी आपली रजा घेतो, मी नक्कीच परत येईन,” असे त्याने सांगितले.
हेही वाचा:





