Top 10 News: जमिनींचे डबल रेकॉर्ड बंद ते चीनचा अमेरिकेला इशारा; जाणून घ्या आजच्या Top 10 news
Top 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोड...

१. महामानवाच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा प्रहार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करत एक्स पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या केवळ सामाजिक कार्याचाच नव्हे, तर त्यांच्या प्रगल्भ आर्थिक ज्ञानाचाही विशेष उल्लेख केला. राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या केवळ सामाजिक कार्याचाच नव्हे, तर त्यांच्या प्रगल्भ आर्थिक ज्ञानाचाही विशेष उल्लेख केला. ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाचा संदर्भ देत, बाबासाहेबांनी मांडलेले विचार आजही रुपयाच्या घसरणीच्या काळात मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर कडक शब्दांत टीका केली. महापुरुषांना जाती-पातीत विभागणे, केवळ पुतळे उभारणे आणि कर्कश्य आवाजात मिरवणुका काढणे यातच आजचे राजकारण अडकले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नसून, समाजाच्या शेवटच्या घटकाचा आर्थिक विकास होणे महत्त्वाचे आहे. आजच्या ‘सत्तापिपासू’ राजकारणाच्या काळात बाबासाहेबांच्या प्रखर सामाजिक आणि आर्थिक दृष्टीची मोठी उणीव भासत असल्याचे मत त्यांनी मांडले.
२. एकनाथ शिंदेंनी शिवतारेंची रुग्णालयात घेतली भेट
पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे गेल्या काही काळापासून किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यानंतर त्यांची लेक डॉ. ममता विजय शिवतारे पुढे आली आणि तिने विजय शिवतारे यांना किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन विजय शिवतारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अंगावर कीट आणि तोंडावर मास्क घातल एकनाथ शिंदे हिरानंदानी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत शिवतारे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तर शिंदे साहेबांसारख्या संवेदनशील नेतृत्वाने प्रत्यक्ष येऊन भेट घेतल्याबद्दल शिवतारे यांनी कृतज्ञता व्यक्त करत हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील अशी भावना शिवतारे यांनी व्यक्त केली. सध्या बाप-लेकीची प्रकृती स्थिर असून, एका मुलीने पित्यासाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी ठरत आहे.
३. मुंबईच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, दोघांचा मृत्यू
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) सेंटरमध्ये एका नामांकित म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका २८ वर्षीय तरुणाचा आणि २४ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या कार्यक्रमाला मुंबईसह उपनगरातील सुमारे ३ ते ४ हजार तरुणांची मोठी गर्दी उसळली होती. संगीताच्या तालावर तरुणाई थिरकत असतानाच, काही तरुणांची प्रकृती अचानक बिघडली. या तरुणांना ‘पिवळ्या रंगाच्या’ काही संशयास्पद गोळ्या देण्यात आल्या होत्या. या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे एका तरुण आणि तरुणीची प्रकृती खालावली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Top 10 News
४. सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी
बारामती पोटनिवडणुकीदरम्यान, राज्यात मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बारामतीत प्रचारादरम्यान अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. मात्र महिला आणि बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी थेट दादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल असा विश्वास थेट भाषणातूनच व्यक्त केला.
तर संजय राऊत यांनीही सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असतील तर तो भाजपचा मोठेपणा आहे. उद्या फडणवीसांना वारसदार ठरवण्याची वेळ आलीच तर ते एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांनाच झुकतं माप देणार असा दावा केला. अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आपल्या जाहीर भाषणातही बोलून दाखवली होती. मात्र दादा गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा थंडावली होती. परंतु बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री पद देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
५. शहरात जमिनींचे डबल रेकॉर्ड आता बंद
राज्यातील अनेक शहरांमध्ये नगर भूमापन हद्दीत सध्या सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही दस्तऐवज अस्तित्वात असल्याने मोठा प्रशासकीय गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या भागात नगर भूमापन झाले आहे, त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डच ग्राह्य धरण्यात यावे, तेथील सातबारा उतारा बंद करण्यात यावा, अशा सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
यामुळे जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड, असा एकाच पुरावा अस्तित्वात राहणार असून, एक मालमत्ता, एक पुरावा हे धोरण राबविले जाणार आहे. यामुळे एकाच जमिनीवर दोन वेगवेगळ्या विभागांचे दस्तऐवज असल्याने होणारी फसवणूक आता थांबेल. तसेच जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येईल, ज्यामुळे न्यायालयीन वाद कमी होतील. याशिवाय खरेदी- विक्रीचे व्यवहार, बँक कर्ज आणि वारस नोंदी करताना नागरिकांना एकाच कार्यालयातून अधिकृत माहिती मिळेल. Top 10 News
६. अधिवेशन महिला आरक्षणासाठी नाही तर… सोनिया गांधींचा आरोप
महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील नारी शक्ती वंदन अधिनियमासंदर्भात सरकारने विशेष अधिवेशन बोलवलंय. मात्र अधिवेशनाचं टाईमिंग लक्षात घेता हे अधिवेशन महिला आरक्षणासाठी नाही तर मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी असल्याचा आरोप सोनिया गांधींनी एका लेखातून केला.
त्यांनी एका लेखात म्हटले आहे की, प. बंगाल व तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभासाठी सुरू असलेला हा प्रयत्न आहे. खरा मुद्दा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा असून, ही नियोजित पुनर्रचना अत्यंत धोकादायक व संविधानावरच हल्ला आहे.
सरकारने २०२३ ला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ संसदेत मंजूर केला होता; परंतु आगामी जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच हा कायदा लागू करण्याची अट ठेवली. नारी शक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच व्हायला हवी होती.. ती 2029 पर्यंत पुढे का ढकलली? असा सवालही सोनिया गांधींनी केला.
७. आमच्या मार्गात ढवळाढवळ करू नका, चीनचा अमेरिकेला इशारा
होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता वाढला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांना वेढा घालण्याचे आदेश दिल्यानंतर चीन आक्रमक झाला आहे. अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी नाकेबंदी केली आहे. याप्रकरणी चीनने अमेरिकेला उघड इशारा दिला असून, आमच्या व्यापारात आणि ऊर्जा करारात ढवळाढवळ करू नका, असे ठणकावून सांगितले आहे.
अमेरिकेनं नाकेबंदी केल्यामुळे चिनी जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनीतून परत जावे लागले. यामुळे चीनचे संरक्षण मंत्री एडमिरल डोंग जून यांनी अमेरिकेच्या नाकेबंदीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “चीनचे इराणसोबत ऊर्जा आणि व्यापारी करार आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. होर्मुजवर इराणचे नियंत्रण आहे आणि हा जलमार्ग चीनच्या जहाजांसाठी खुलाच राहील. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही,” असे चीनने आपल्या निवदेनात म्हटलंय. दरम्यान, होर्मुझवरून सुरू झालेला हा वाद आता अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील थेट संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. Top 10 News
८. शांती प्रक्रियेसाठी इराणची नवी अट
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा इस्लामाबाद येथे निष्फळ ठरल्यानंतर आता इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात आज अमेरिकेत शांतीवार्ता होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे राजदूत सहभागी होणार असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो उपस्थित राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. मात्र या संभाव्य शांतीवार्तेला हिजबुल्ला या संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. संघटनेच्या नेतृत्वाने इस्रायलसोबत कोणतीही चर्चा न करण्याचं आवाहन केलं आहे.
याचदरम्यान इराणने शांती प्रक्रियेसाठी नवीन अट पुढे केली आहे. महायुद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी इराणने पाच देशांकडे केली आहे. यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरैन आणि जॉर्डन यांचा समावेश आहे. या देशांनी अमेरिकेला साथ दिल्याचा आरोप करत इराणने भरपाईची मागणी केली आहे. तरदुसरीकडे, पुन्हा एकदा इराण-अमेरिका चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
९. IPL टी-२० क्रिकेट स्पर्धेत विदर्भाच्या प्रफुल हिंगेची कमाल
आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी पराभव केला. या विजयात विदर्भाच्या प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन या नवोदित गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. विशेषतः प्रफुल हिंगेने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात तीन बळी घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशनच्या धमाकेदार ९१ धावा आणि क्लासेनच्या ४० धावांच्या जोरावर २१६ धावांचे विशाल लक्ष्य उभारले होते. प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन डी प्रेटोरियस या तिघांना शून्यावर बाद करून राजस्थानचे कंबरडे मोडले. राजस्थानचा कर्णधार रियान परागनेही या पराभवानंतर हिंगे आणि साकिबच्या अचूक माऱ्याचे कौतुक केले. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा सलग चार विजयांचा रथ अखेर रोखला गेला आहे.
१०. अभिनेता भूषण प्रधानने गुपचुप उरकला साखरपुडा
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान आपल्या फिटनेस आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण प्रधान यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली भूषण प्रधाननं इन्स्टावर पोस्ट करत एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्यानं एका मुलीला मिठी मारली असून ती तरुणी पाठमोरी उभी आहे.
भूषणचा चेहरा मात्र, फोटोत स्पष्ट दिसतोय. दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवलेत. तर दोघांच्याही हातात अंगठ्या दिसतायत. तसेच, “24 जुलै 2026 ही तारीख लक्षात ठेवा आणि आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा.”, असं फोटोवर लिहिलेलं आहे. तर, या पोस्टच्या कॅप्शनमध्येही भूषणनं तारीख टाकली आहे. यावरून भूषणनं गपचूप साखरपुडा केल्याचं बोललं जातंय. Top 10 News
हेही वाचा :








