Top 10 News : सहर शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक, आज दक्षिण भारताला ४ नवीन गाड्यांची भेट , अमेरिका WHO मधून बाहेर वाचा टॉप १० बातम्या एका क्लिकवर

दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार
Top 10 News। स्विझर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. या करारांमधील 83 टक्के करार थेट परकीय गुंतवणूक असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येत असल्याचं त्यानी सांगितलं. त्यासोबत 16 टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागिदारीत आहे. या 18 देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडनसह आणखी ६ देशांचा समावेश आहे.
सहर शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक
मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद चांगलाच पेटला आहे. विजयानंतर सहरने केलेल्या भाषणात, संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवण्याचं आवाहन केलं होतं. तिच्या याच वक्तव्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे आक्रमक झाले. हे वक्तव्य म्हणजे हिंदुंना धमकी असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली.. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत तातडीची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर सहर शेखने या वादानंतर स्पष्टीकरण देत, माझं वक्तव्य धर्माच्या आधारावर नव्हतं, तर राजकीय आशयाचं होतं असं म्हटलं.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप-एमआयएममध्ये युती
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये सभापती पदासाठी भाजप अन् एमआयएमच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमनं एकमेकांना साथ दिल्याचं बोललं जातंय. एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाल्याची चर्चा आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत आल्यानं अचलपूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच आता या युती संदर्भात भाजप नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी स्पष्टीकरण देत आहि कोणतीही युती झाली नसल्याचं म्हटलंय.
अकोल्यात महापौर निवडणुकीत ट्विस्ट येणार
अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. अकोल्यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 38 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे. आमदार साजिद खान आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड ही बैठक झाली. या बैठकीत एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. काँग्रेसने ठाकरे गटाला मोठा प्रस्ताव दिला होता. एकंदरीत 21 नगरसेवक असलेल्या काँग्रेसने,”आम्हाला कुठलंचं पद नकोय, भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत यावं, अन् अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करावी” असे म्हटले आहे.
जळगावमध्ये कारचा भीषण अपघात Top 10 News।
जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला.अपघातात इनोव्हा कारमधील तरुणी जागीच ठार झाली. तर कार चालक तरुण गंभीर जखमी झाला. महामार्गावर कारचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघातात इनोव्हा कारचा अक्षरक्ष: चुराडा झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली.अपघातात जखमी झालेल्या कारचालक तरुणाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या कल्याण-डोंबिवलीमधील युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्री केलं आहे. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यासंदर्भात उत्तरं देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
वाळव्यात स्व. राजाराम बापूंच्या प्रतिमेवर करणी
महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असून त्यामध्ये सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले जात असल्याचं दिसतंय. यामध्ये करणी आणि काळी जादूचा मार्गही अवलंबला जात आहे. परंतु सांगलीमध्ये काही वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं. जिवंत नव्हे तर चक्क मयत व्यक्तीच्या फोटोवर करणी केल्याचं दिसून आलं. सांगलीतील वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्याचे, लिंबू फिरवल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुरोगामी ओळख असणाऱ्या जिल्ह्याला डाग लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत.
आज दक्षिण भारताला ४ नवीन गाड्यांची भेट
पंतप्रधान मोदी आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आणि इतर प्रदेशांसाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. राजधानीत एका आधुनिक डिजिटल पोस्ट ऑफिसचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. ते तिरुवनंतपुरममध्ये CSIR-NIIST इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि एंटरप्रेन्योरशिप हबची पायाभरणी देखील करतील, ज्याचा उद्देश नवोपक्रम आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आहे. हे केंद्र राज्यातील उद्योजकता आणि नवीन तंत्रज्ञानाला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल. शिवाय, रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान चार नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये तीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे, ज्यामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान प्रवास परवडणारा आणि जलद होईल.
झारखंडमध्ये ट्रेन आणि ट्रकच भीषण अपघात
झारखंडमधील देवघर येथे रेल्वे आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. हावडा-जसिदीह मुख्य रेल्वे मार्गावरील रोहिणी-नवाडीह क्रॉसिंगजवळ एका वेगाने येणाऱ्या ट्रकची ट्रेनशी टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकचं मोठं नुकसान झालंय. ट्रक आणि ट्रेनच्या अपघातात एका दुचाकीचेही नुकसान झालंय. दरम्यान स्थानिक रहिवासी आणि सुरक्षा दलांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आलंय. ट्रकच्या खाली दबलेल्या दोघांना बाहेर काढलं. जखमी झालेल्या दोघांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.
अमेरिका WHO तून बाहेर पडले
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतलीय. संघटनेच्या जिनेव्हातील मुख्यालयावरून देशाचा ध्वजही काढून टाकण्यात आला. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केलंय, ज्यामध्ये, अमेरिका आता WHO मधून माघार घेत आहे, परंतु संघटनेचे २६ अब्ज डॉलर्सचे थकित कर्जदेखील परत करणार असल्याचं म्हटलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या उपाययोजना लागू करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केलीय.





