TOP 10 : ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ एकाच दिवशी रिलीज ते शरद कपूरचे आवाहन; एका क्लिकवर वाचा मनोरंजन-लाइफस्टाइलच्या TOP10 News
TOP 10 Entertainment : लाइफस्टाइलच्या जाणून घ्या खास टिप्स

TOP 10 Entertainment : मनोरंजन – लाइफस्टाइल TOP 10
1. सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी.! गोव्यात ९ दिवस जागतिक सिनेमाचा जल्लोष; ‘IFFI’चा पडदा २० नोव्हेंबरला उघडणार
जगभरातील सिनेरसिकांसाठी एक मोठी पर्वणी! कारण, गोव्यात पुन्हा एकदा जागतिक सिनेमाचा महासोहळा रंगणार आहे. ५७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे. यंदाची संकल्पना आहे ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’! विशेष म्हणजे, तब्बल १३७ देशांमधून १ हजार ९०० हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या असून, ८६ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात भारताच्या ‘रामायण’ चित्रपटाला ब्रिक्स विशेष विभागात स्थान मिळालं आहे. तर ‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ हे चित्रपट ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाची सुरुवात करणार आहेत. उद्घाटनासाठी ‘फादरलँड’, मध्य महोत्सवी चित्रपट म्हणून ‘आय मॅटर’, तर समारोपासाठी ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्पेन सन्माननीय देश, तर रशिया भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे नऊ दिवस गोवा जागतिक सिनेमाच्या रंगात रंगणार, हे मात्र नक्की!
2. मुलगा टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार जॅकी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘वरच्याला हात जोडतो अन् पुढे जातो!’
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. आता या धक्कादायक घटनेवर त्याचे वडील आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जॅकी म्हणाले, ‘वरच्याला हात जोडतो आणि पुढे जातो. एक अपघात होता, तो घडून गेला. तोदेखील एक अनुभव होता.’ दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात दोन हल्लेखोरांनी टायगरच्या कारवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला, मात्र चालकासह एक व्ह्लॉगर जखमी झाला होता. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जबाबदारी स्वीकारल्याची पोस्टही समोर आली होती. मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून, सात जण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मुलावर आलेल्या संकटानंतर जॅकी यांची ही शांत प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
3. प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न अन् राहायला आलिशान घर.! सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली….
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबद्दल एकेकाळी अशी अफवा पसरली होती, जी ऐकून खुद्द अभिनेत्रीही चक्रावून गेली होती. सोनालीचं एका प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न झालं असून, त्या राजकारण्याने तिला राहण्यासाठी घरही दिलंय, अशी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, या अफवेवर विश्वास ठेवून सोनालीच्या चुलत बहिणीनेही तिला फोन केला आणि थेट विचारलं, ‘काय तुझं लग्न झालंय का?’ यावर सोनालीनेही म्हणाली, ‘अगं, माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवेन. बहिण आहेस माझी तू!’ तिच्या या उत्तरानंतरही बहिणीने ‘अगं, होऊ शकतं’ असं म्हटलं. अखेर एका मुलाखतीत सोनालीने हा मजेशीर किस्सा सांगत या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. आता तिचा हा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.
4. रावण साकारण्यासाठी यशने घेतली प्रचंड मेहनत; पोशाखाचं वजन तब्बल ३३ किलो
बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश विशेष चर्चेत आला आहे. रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल ३० ते ३३ किलो वजनाचा पोशाख परिधान करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर सानिया सरदारिया यांनी एका मुलाखतीत यशच्या वेशभूषेबाबत खुलासा केला. यशच्या पोशाखाचं वजन साधारण १६ ते २० किलो असायचं, तर काही प्रसंगांमध्ये ते ३३ किलोपर्यंत जायचं. विशेष म्हणजे, यशच्या मुकुटाचं वजन तब्बल १.८ किलो होतं. मुकुट हलका करण्यासाठी अनेक थ्रीडी मॉडेल्स तयार करण्यात आली. मात्र, प्रयत्न करूनही त्याचं वजन यापेक्षा कमी करता आलं नाही. या अवजड पोशाखामुळे यशला चित्रीकरणादरम्यान चालताना आणि हालचाली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, एवढ्या आव्हानात्मक परिस्थितीतही यशने सेटवरील वातावरण हलकंफुलकं ठेवलं आणि आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांना हसवत ठेवलं, असंही सानिया यांनी सांगितलं.
5. किर्रर्र अंधार, सुनसान रस्ता अन् रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’मध्ये थरारक अंदाज
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळाच आणि दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. घनदाट जंगल, किर्रर्र अंधार, निर्जन रस्ता आणि मध्यरात्रीचा बसमधील प्रवास अशा थरारक दृश्यांनी ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरमधील एका दृश्यात रिंकू निर्जन रस्त्यावर आणि बसमध्ये एकटी दिसते. आजूबाजूला गडद अंधार आणि भयाण शांतता असताना तिच्या चेहऱ्यावरील भाव लक्ष वेधून घेतात. त्यामुळे नेमकं काय घडत आहे, रिंकूच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात कोणतं संकट आलं आहे आणि या सगळ्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. ट्रेलरमध्ये तिचे काही दमदार अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्यामुळे रिंकूचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. रिंकूच्या व्यक्तिरेखेचा या सगळ्या घटनांशी नेमका काय संबंध आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
6. व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेता शरद कपूरची प्रतिक्रिया समोर; केलं आवाहन
बॉलिवूड अभिनेता शरद कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र त्यानंतर स्वतः शरद कपूरनेही नव्या व्हिडीओच्या माध्यमातून यावर भाष्य करत “मला पैशांची कोणतीही अडचण नाही,” असे स्पष्ट केले आहे. “मी एक उत्तम अभिनेता आहे आणि हे तुम्हालाही माहीत आहे. पैशांची कोणतीही अडचण नाही; फक्त मला पुन्हा एकदा काम सुरू करायचे आहे,” असे त्याने म्हंटले. तर आपल्या प्रकृतीविषयी सांगताना शरदने माहिती दिली की, मी वेड्यासारखा बार्सिलोनाला फुटबॉल खेळायला गेलो होतो. तिथल्या मोठ्या खेळाडूंना पाहून मी स्वतःलाही मेस्सी समजू लागलो आणि त्याच नादात माझ्या पायाला दुखापत झाली.” तसेच येत्या दोन महिन्यांत आपण पूर्णपणे बरे होऊ, असा विश्वास डॉक्टरांनी दिल्याचे शरदने सांगितले.
7. मातृभूमी आणि ईठा एकाच दिवशी रिलीज होणार; पहिल्या दिवशी कोण मारणार बाजी?
‘सिकंदर’च्या अपयशानंतर सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक कारणांमुळे लांबणीवर पडलेला हा युद्धपट आता ४ डिसेंबरला रिलीज होणार आहे. मात्र, याच दिवशी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. ‘मातृभूमी’ची कथा भारत-चीन संबंध आणि गलवान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटातून सलमान खान पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी ५ ते ८ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. तर दुसरीकडे, श्रद्धा कपूर ‘ईठा’ चित्रपटात प्रसिद्ध लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. ‘स्त्री २’च्या यशानंतर श्रद्धाच्या या भूमिकेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे ४ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर सलमानचा मातृभूमी की श्रद्धा कपूरचा ईठा बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
8. भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या पांढऱ्या भाताचं सत्य
भारतीयांच्या रोजच्या जेवणातील भात वजन वाढवतो का आण रक्तातील साखर वाढते का, असे प्रश्न अनेकांना पडतात. मात्र, भात पूर्णपणे सोडण्याची गरज नाही, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पांढऱ्या भातामध्ये कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. मात्र, त्यात ब्राऊन राइसच्या तुलनेत फायबर कमी असते. भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास एकूण कॅलरीज वाढू शकतात, तर काही प्रकारच्या पांढऱ्या भातामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे भातासोबत डाळ, भाज्या, कोशिंबीर आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी भाताचे प्रमाण आणि प्रकार याबाबत विशेष काळजी घ्यावी. थोडक्यात, भात खाण्यापेक्षा तो किती आणि कशासोबत खातो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
9. मेटाबॉलिज्म चांगले ठेवायचेय? रोजच्या दिनक्रमात करा या ७ गोष्टी
शरीर निरोगी ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय प्रक्रिया योग्य पद्धतीने कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम मेटाबॉलिज्म करते. मात्र, चुकीच्या खाण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो. मेटाबॉलिज्म चांगले ठेवण्यासाठी आहारात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. दररोज पुरेशी झोप घ्या आणि नियमित चालणे, योग किंवा व्यायाम करा. दिवसभर पुरेसे पाणी प्या. जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालण्याची सवय लावा. तसेच तासन्तास एकाच जागी बसून राहणे टाळा आणि अधूनमधून शारीरिक हालचाल करा. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सक्रिय जीवनशैली या सातत्यपूर्ण सवयींमुळे मेटाबॉलिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
10. थंडीमध्ये ओठ फाटू नयेत म्हणून करा या ६ सोप्या टिप्स
हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे ओठ कोरडे पडणे, भेगा जाणे आणि पापुद्रे निघण्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ओठांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी नियमित लिप बाम लावा आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. ओठांवर वारंवार जीभ फिरवण्याची सवय टाळा. बाहेर जाताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला लिप बाम वापरा. रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझिंग लिप बाम लावल्याने ओठांचा ओलावा टिकण्यास मदत होते. तसेच ओठांवरील पापुद्रे हाताने किंवा दातांनी काढू नका. या छोट्या सवयींमुळे हिवाळ्यात ओठांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा:





