Actor Surya : सर्वात मोठी रिस्क घेतली; कठीण टप्प्यावर पत्नीने दिला आधार, ज्योतिकाविषयी भरभरून बोलला सूर्या
Actor Surya : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूर्याने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आलेल्या आर्थिक अडचणींबद्दल आणि त्या काळात पत्नी ज्योतिकाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोठा खुलासा केला.

Actor Surya : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या सध्या त्याच्या ‘करुप्पू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटामागे मात्र संघर्ष आणि मोठी आर्थिक जोखीम दडलेली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूर्याने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आलेल्या आर्थिक अडचणींबद्दल आणि त्या काळात पत्नी ज्योतिकाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोठा खुलासा केला.
‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सूर्या म्हणाला की, चित्रपट रिलीज होण्याच्या अगदी आधी त्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी बिकट होती की चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याला अतिरिक्त कर्ज घ्यावे लागले. हा निर्णय केवळ व्यावसायिक नव्हता, तर वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम करणारा होता, असं मुलाखतीत बोलताना सूर्याने स्पष्ट केलं.
याविषयी बोलताना सूर्या म्हणाला, “ऐनवेळी मोठे आर्थिक आव्हान समोर आले होते. अशा वेळी ज्योतिकाने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि अधिक कर्ज घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. काही विपरीत घडले असते, तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागले असते. चित्रपटसृष्टीत कितीही अनुभव असला तरी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. अशा अनोळखी वाटेवर पुढे जाण्याचे धैर्य मला तिच्या विश्वासामुळे मिळाले.” अशा शब्दांत पत्नी ज्योतिकाचं कौतुक सूर्याने केलं.
मात्र, ज्योतिकाने या यशाचे श्रेय सूर्यालाच दिले. ती म्हणाली, “चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि केलेली धडपड कौतुकास्पद आहे. या निर्णयामध्ये माझा विशेष वाटा नाही. हा पूर्णपणे त्याचा निर्णय आणि त्याची जिद्द होती. आम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो, पण चित्रपटासाठी त्याने घेतलेली जोखीम आणि दाखवलेला निर्धार हा त्याचाच होता.”
करुप्पूने केली मोठी कमाई
दरम्यान, १५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘करुप्पू’ या चित्रपटाने सर्व अडचणींवर मात करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून तो सूर्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे.



