राज्यभरात दिवसभरात कुठे किती पडला पाऊस, वाचा आकडेवारी…! चंद्रपूर जिल्ह्यात 2 जण वाहून गेले; मुंबईत इमारत कोसळून महिला ठार

Maharashtra Rain Update – महाराष्ट्रातील अनेक भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु झाला होता. हवामान खात्याने रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, मुंबईसाठी यलो, आणि ठाणे, रायगड, सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अल्रट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली होती.

पुढील काही तास या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात काही दुर्घटना देखील घडल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले आहेत. तर इमारत कोसळून एक महिला ठार झाली.
चंद्रपूर जिल्ह्यीतल नागभीड तालुक्यात 2 व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. या दोन घटना वेगवेगळ्या गावात घडल्या असल्या तरी त्या एकाच नाल्यावर घडल्या. पहिली घटना विलम गावात घडली. विलम येथील ॠणाल प्रमोद बावणे (11) हा मुलगा सकाळी 11.30 च्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्याला आलेला पूर बघण्यासाठी गेला होता.
मुलाने नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पण अर्ध्यात असताना अचानक त्याचा पाय घसला आणिा तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अपयश आले. दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (30) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला.
दुसरीकडे मुंबई येथील ग्रँट रोड रेल्वे स्थानकाबाहेरील एक इमारत कोसळली. या घटनेत 1 महिला ठार, तर 3 जण जखमी झाले आहेत. महिला एका हॉटेलजवळ येताच तिच्या अंगावर इमारतीचा ढिगारा पडला.
नागपुरात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी –
नागपुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील सखल भागांतील नागरी वस्त्यांत पाणी शिरले असून, आज शनिवारी शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. पावसाचा विमान सेवेलाही फटका बसला आहे.
नागपूर शहर व जिल्ह्यात आज सकाळपासूनच विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपुरात गत 3 तासांत सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला. अजून 3 तास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर तर प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत आहे. रुळांवरही पाणी साचले.
पावसामुळे शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, सिरसी, हिंगणघाट रस्ते बंद झाले. हवामान विभागाने भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ,वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली –
कोल्हापुरात पावसाने जोर धरला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटावर आहे. तर जिल्ह्यातील 74 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसान जोर धरल्यामूळ अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
लोकल ट्रेन धावत आहेत उशिराने –
मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने भल्यापहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. हार्बर मार्गावरील गाड्याही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु असल्याची माहिती आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्या देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने स्थानकावर येत आहेत. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वे पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.





