Sharad Pawar – आणीबाणीसाठी इंदिरा गांधींना दोष दिला जातो, हे सर्व खरं आहे. पण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशाची माफी मागितली होती, ही गोष्ट विसरता कामा नये. त्यामुळे नंतरच्या काळात जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आणि चित्र बदलले होते. मात्र आज पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला. मुंबईतील दादर येथे आज कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. शरद पवार म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनात्मक अधिकारांची गळचेपी करत देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळात राष्ट्रीय अणीबाणीला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश होता. जॉर्ज यांचे आजही स्मरण करतो कारण त्यांनी देशाची अखंड सेवा केली. आणीबाणीचा कालखंड वेगळा होता. त्यावेळी काँग्रेसमध्येही मोठा वर्ग अस्वस्थ होता. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. काँग्रेसचे दोन पक्ष झाले. इंदिरा काँग्रेसमधून बाहेर पडून काँग्रेस एस पक्ष अस्तित्वात आला, असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच आज जे वृत्तपत्रात काम करतात त्यांना माहीत असेल, परंतु बाकीच्यांना माहीत नाही. आज वृत्तपत्र आपले मत स्वच्छ मांडत आहेत. परंतु जे वृत्तपत्र त्यांचे स्वच्छ मत मांडत आहेत आणि सरकारच्या विरोधात आहेत, अशा वृत्तपत्रांना किंवा तेथील पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन जातो. त्यांना सांगण्यात येते की ही बातमी अशी छापू नका. एक प्रकारची धमकी पत्रकारांना दिली जात आहे. त्यामुळे अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे? याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. यासाठी आम्ही वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टीकोन पुढे घेऊन उभे राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.