Satara | भावी पिढीसाठी शिक्षणासह क्रीडाविषयक उपलब्ध करुन देणार

कोरेगाव, (प्रतिनिधी) – विधानसभा मतदारसंघात मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन देत असताना भावी पिढीसाठी शिक्षणासह क्रीडा विषयात देखील कामे केली जात आहेत. सुभाषनगरच्या मॅफको कंपनीच्या आवारात ४५ कोटी रुपयांचे नाट्यगृहासह क्रीडा संकुल उभे राहत आहे.
त्याचबरोबर गोळेवाडीच्या हद्दीत शंभर कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले जाणार असून, त्यासाठी पहिला टप्पा म्हणून ३२ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. नजिकच्या काळात त्याचे भूमिपूजन केले जाणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिली.
मॅफको कंपनीच्या आवारात राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे ४५ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय संकुलाचे भूमिपूजन ना. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे,
कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, न गराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, यांच्यासह प्रभागातील प्रमुख पदाधिकार्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
ना. शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात जास्त निधी कोरेगाव मतदारसंघाला मिळाला आहे. आयुष्यात कधीही मिळणार नाही, एवढ्या मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध झाले असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासकामे केली जात असून, त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी केला पाहिजे.
रस्त्याची कामे होणार म्हणजे चिखल होणारच, जलवाहिनी नव्याने टाकायची झाल्यास पिण्याच्या पाण्याचा अपुरा किंवा कमी दाबाने पुरवठा होणारच, याबाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी विकासकामांसाठी सहकार्य करावे, एकदा का विकासकामे पूर्ण झाली, तर पुढील शंभर वर्षे कोरेगावकरांना कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.
उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी प्रास्ताविकात मॅफको परिसरात नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमास सुभाषनगर, संभाजीनगर, अजिंक्यनगर, शाहूनगरसह सुलतानवाडी, गोळेवाडी, न्हाळेवाडी, एकसळ परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल
संपूर्ण देशातील पहिले वहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल कोरेगावात उभारले जात आहे. नाट्यगृहासह, जिमनॅशियम, स्विमिंग पूल, कुस्तीचा आधुनिक आखाडा, सुमारे ३०० विद्यार्थी एकाचवेळी अध्ययन करु शकतील, अशी डिजीटल आणि साऊंडप्रुफ लायब्ररीचा त्यामध्ये समावेश आहे.
कोरेगावकरांची पहिल्या दिवसापासून नाट्यगृहाची मागणी होती, ती आता पूर्ण होत आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांची जन्मभूमी असलेल्या कोरेगाव नगरीमध्ये त्यांच्याच नावाने हे नाट्यगृह उभारण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे ना. महेश शिंदे यांनी सांगितले.





