Vijay Deverakonda-Rashmika Mandanna: ‘बाकी सगळे गेले उडत!’ ट्रोलर्सना विजय देवरकोंडाचं सडेतोड उत्तर; रश्मिकाला म्हणाला…
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna विजयच्या आधी रश्मिका मंदानानेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने तिच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आणि ट्रोलिंगला उत्तर दिलं. विजयसोबतच्या नात्याबद्दल लोकांकडून व्यक्त होणाऱ्या मतांवर तिने आपली भूमिका स्पष्ट केली.

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या चर्चेत आहेत. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले. मात्र, कार्यक्रमातील काही वक्तव्यांमुळे या जोडीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता रश्मिकानंतर विजयनेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मी आणि ती संपूर्ण जगाच्या विरोधात असलो, तरी हरकत नाही,’ अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला विजय देवरकोंडा?
विजय देवरकोंडाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलं. या पोस्टमध्ये त्याने रश्मिकाचा उल्लेख आपली सर्वात चांगली मैत्रीण आणि पत्नी असा केला. तसेच, रश्मिकाची निवड हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णयांपैकी एक असल्याचंही त्याने सांगितलं.
विजयने पोस्टमध्ये लिहिलं की, त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे रश्मिका. तिची निवड केल्याचा त्याला आनंद आहे. त्यांच्या नात्याबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या लोकांना उत्तर देताना त्याने म्हटलं की, ते दोघेही एकत्र आनंदी आहेत आणि त्यासाठी तो स्वतःला भाग्यवान समजतो.
‘मी आणि ती संपूर्ण जगाच्या विरोधात एकत्र असलो, तरी चालेल,’ अशा आशयाचं वक्तव्य करत विजयने आपल्या नात्याबद्दल ठाम भूमिका मांडली. प्रेमाचा आनंद साजरा करणाऱ्या आणि साधेपणाने, आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे त्याने आभारही मानले. त्याचवेळी, त्यांच्या नात्याचा आदर न करणाऱ्या आणि विनाकारण टीका करणाऱ्या लोकांना त्याने स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
रश्मिकानेही ट्रोलर्सना सुनावलं
विजयच्या आधी रश्मिका मंदानानेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने तिच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आणि ट्रोलिंगला उत्तर दिलं. विजयसोबतच्या नात्याबद्दल लोकांकडून व्यक्त होणाऱ्या मतांवर तिने आपली भूमिका स्पष्ट केली.
दोघांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विजय रश्मिकाला आपल्या पाठीवर बसवून फिरवताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून पसंती मिळत असतानाच, काही नेटकऱ्यांनी मात्र त्यांच्या नात्यावर टीका केली आहे.
‘कॉफी विथ करण’मधील वक्तव्यामुळे ट्रोलिंग
विजय आणि रश्मिका ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. याचदरम्यान रश्मिकाने विजयला लग्नासाठी प्रपोज केल्याचा किस्सा सांगितला.
रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, तिने विमानतळावर विजयला लग्नाबद्दल विचारलं होतं. त्यावेळी विजयने तिला हा प्रश्न आणखी शंभर वेळा विचारायला सांगितलं. रश्मिकाने जवळपास वर्षभर विजयच्या होकाराची वाट पाहिल्याचंही सांगितलं. त्यानंतर विजयनेही हळूहळू रश्मिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
या संभाषणातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विजयवर टीका केली. काहींनी त्याच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी रश्मिकाने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल केला.
एका नेटकऱ्याने विजयला ‘रेड फ्लॅग’ म्हटलं, तर दुसऱ्या युजरने रश्मिकाने लग्नासाठी इतकी वाट पाहण्याऐवजी अविवाहित राहणं पसंत केलं असतं, असं मत व्यक्त केलं. आणखी एका युजरने रश्मिका विजयवर प्रेम करते, तर विजय स्वतःवरच प्रेम करतो, अशी टीका केली.
View this post on Instagram
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे विवाह केला. हा विवाहसोहळा खासगी स्वरूपात पार पडला. सकाळी तेलुगू परंपरेनुसार विवाहविधी झाले, तर संध्याकाळी रश्मिकाच्या कुटुंबाच्या कोडवा परंपरेनुसार विधी पार पडले. या सोहळ्यात रश्मिकाने अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली होती, तर विजय पारंपरिक धोतीमध्ये दिसला होता.
एकीकडे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे विजय आणि रश्मिका यांनी एकमेकांना साथ देत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.





