‘रोहित शर्माला संघातच घेऊ नये’, काँग्रेस नेत्यापाठोपाठ आणखी एका खासदाराचे वक्तव्य, कर्णधारपदासाठी सुचवली ‘ही’ नावे

Rohit Sharma | एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताच्या कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. रोहितच्या फिटनेसविषयी बोलताना शमा मोहम्मद यांनी त्याचा उल्लेख लठ्ठ असा केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजपकडून काँग्रेसवरून निशाणा साधला जात असतानाच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय शमा मोहम्मद यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ‘लठ्ठ’ आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे अशी टिप्पणी करतानाच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. आता सौगत रॉय यांनी देखील रोहित भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नकोच, असे वक्तव्य केले आहे.
शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याचे समर्थन करत सौगत रॉय म्हणाले की, हा राजकारणाचा विषय नाही, हा क्रिकेटचा विषय आहे. रोहित शर्माला अजून किती दिवस सवलत दिली जाणार? दोन वर्षांत एकदा शतक मारून बाकीच्या सामन्यां लवकर बाद होणे, याने त्याचे संघातील स्थान योग्य ठरत नाही. त्याने संघात अधिकार गाजवू नये.
काँग्रेस नेत्याने हे बरोबर सांगितले आहे. त्याच्या वजनाबद्दलही चिंता आहे. तो जाड झाला आहे, पण लोकांना याने फारसा फरक पडत नाही, असे म्हणतानाच रोहित शर्माला संघात स्थान असू नये असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच, बुमराह किंवा श्रेयस अय्यर कर्णधार असायला हवे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शमा मोहम्मद यांच्या विधानापासून काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले आहे. त्यांचे विधान पक्षाच्या भूमिकेशी जुळत नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. टीकेची झोड उठल्यानंतर शमा यांनी सारवासारव केली आहे. ‘मी कोणाचाही अपमान करण्यासाठी पोस्ट केली नाही. एक खेळाडू म्हणून त्याचे वजन जास्त आहे, असे पोस्टमध्ये म्हटले होते. हे बॉडी शेमिंग नाही. मी केवळ फिटनेसवर बोलत होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.





