पुणे | बारामतीत भाकरी फिरविण्याची वेळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी १५ वर्ष खासदार म्हणून निवडून दिले.
आता, मात्र भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी बरोबरच फिरली पाहीजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज गुरूवारी भरण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, बारामतीची लढाई ही ऐतिहासिक लढाई असली तरी ही वैयक्तिक लढाई नाही. ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे. लोकसभेची ही निवडणूक एका मतदारसंघापुरतीच मर्यादित नाही. देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे.
ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही शिंदे यांनी केली. नरेंद्र मोदी हे शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आले. मात्र त्यांनी पवारांचे बोट सोडल्यानंतरच खऱ्या अर्थाने देशात विकासाचा कायापालट झाला असून आता अजित पवारांनीही त्यांचे बोट सोडले असल्याचेही शिंदे म्हणाले.
मोदी विरूध्द राहूल गांधी लढाई : देवेंद्र फडणवीस
बारामती लोकसभा मतदार संघातील लोकसभेची निवडणूक ही शरद पवार विरुध्द अजित पवार, सुनेत्रा पवार विरुध्द सुप्रिया सुळे अशी ही निवडणूक नाही. देशाचा नेता निवडण्याच्या अनुषंगाने ही निवडणूक महत्वाची आहे.
नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी ही लढाई आहे. त्यामुळे विकासाला की विनाशाला मत द्यायचे ते मतदारांना ठरवावे लागणार आहे. देशात सुरक्षा, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, गरीबी दूर करणे ही कामे कोण करु शकते हे ठरविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने बारामतीच्या सुनेला दिल्लीत पाठवा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.





