सीमेवरील जवानांसाठी पुण्याहून तिळगूळ

‘भारत माता की जय’च्या घोषणा देत, तिळगूळाचे पूजन
पुणे – सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातून सुमारे 200 किलो तिळगूळ पाठविण्यात आला. “भारत माता की जय’ अशा घोषणा देत, सोमवारी तिळगूळाचे पूजन झाले.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सैनिक मित्र परिवार यांच्यासह सुमारे 25 संस्था आणि मंडळांच्या वतीने तिळगूळ पाठविण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. नंदू फडके, वीरमाता उर्मिला मिजार, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
1996 पासून सैनिक मित्र परिवाराचे कार्य सुरू आहे. सण-उत्सव सैनिकांसोबत साजरे करावे, या संकल्पनेतून मकरसंक्रांतीचा उपक्रम सुरू झाला. जम्मू-काश्मिरपासून ते राजस्थानपर्यंतच्या सीमेवर हा तिळगूळ सैनिकांना पाठविण्यात येणार असल्याचे आनंद सराफ यांनी सांगितले.
शाहीर हेमंत मावळे यांनी “सैनिक माझे नाव’ हे गीत सादर केले. तर, पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.





