सोनम वांगचुक यांना ‘टिळक राष्ट्रीय पुरस्कार’

पुणे – लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यावर्षी लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना जाहीर झाला. येत्या दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर वांगचुक यांना जाहीर झालेला पुरस्कार औचित्याचा ठरणार आहे.
दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण होते. मात्र यंदा हा कार्यक्रम होणार नसून, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वस्त डॉ. रोहित टिळक उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे 37वे वर्ष आहे. 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी यांसह मागील वर्षी बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे. लडाख सीमेवरील अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली होती.





