मुंबईत उद्या कडक बंदोबस्त.! दसरा आणि मेळाव्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार तैनात

Mumbai – राजकीय पक्षांच्या दसरा मेळावे आणि २ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्तींच्या विसर्जनासाठी होणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात १६,५०० हून अधिक कॉन्स्टेबल आणि सुमारे २,९०० अधिकारी तसेच विविध विशेष तुकड्यांचे कर्मचारी तैनात केले आहेत.
यावर्षी दसरा आणि गांधी जयंती एकाच दिवशी साजरी केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेना त्यांचा वार्षिक दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आयोजित करणार आहेत, जरी तो पूर्वी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात होणार होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी शिवसेना (यूबीटी) मध्य मुंबईतील दादर परिसरातील त्यांच्या पारंपारिक ठिकाणी – शिवाजी पार्क येथेही अशाच प्रकारचा मेळावा घेणार आहेत. या पक्षांच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने समर्थक जमण्याची शक्यता आहे.
या राजकीय मेळाव्या आणि दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकी लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. सात अतिरिक्त पोलिस आयुक्त, २६ उपायुक्त, ५२ सहाय्यक आयुक्त, २,८९० अधिकारी आणि १६,५५२ हवालदार तैनात करण्यात आले आहेत,” असे ते म्हणाले.
याशिवाय, राज्य राखीव पोलिस (एसआरपी), क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (बीडीडीएस), श्वान पथके तसेच डेल्टा, कॉम्बॅट आणि दंगल नियंत्रण आणि होमगार्ड्सच्या तुकड्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आहेत.
गर्दी टाळण्यासाठी आणि कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील भागात गर्दी व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाबाबतही व्यवस्था केली आहे. रॅली आणि मिरवणुकी लक्षात घेता मार्ग बदलण्यात आले आहेत.





