Weather Alert Maharashtra : दिवाळीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतानाच हवामानाने मात्र अनपेक्षित वळण घेतले आहे. मंगळवारी अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यात लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. आता पुन्हा एकदा राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास असण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये पावसाची शक्यता मुंबई आणि परिसरात संध्याकाळी किंवा रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांतही अशाच प्रकारचे हवामान राहील, असा अंदाज आहे. मच्छिमारांसाठी सतर्कतेचा इशारा कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने विशेष इशारा दिला आहे. मच्छिमार व किनारी रहिवाशांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वादळी वारे आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे प्रवाशांनीही प्रवास करताना सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.