पुणे | विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सलग दुसऱ्या दिवशी दुपारीच शहरासह उपनगरांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या धुव्वाधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, तर ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटनेने वाहतूक बंद झाली, वाहनांचे नुकसान झाले. लोहगाव परिसरात हंगामातील सर्वाधिक भागात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद झाली, तर वडगावशेरी, शिवाजीनगर भागांत सर्वाधिक पाऊस झाला.
मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि रात्री हवेत गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे दोन दिवसांपासून दुपारनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी (दि. 10) दिवसभर उन्हाचा चटका आणि अधूनमधून ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन ते अडीचदरम्यान आकाशात ढग दाटून आले आणि क्षणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
आज शहराचा पूर्व भाग पावसाने झोडपून काढला, तर पश्चिम भागासह शहराच्या मध्यवर्ती भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तासभारानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सलग अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. नगर रोड, विमानतळ रस्ता, कर्वे रस्ता,
पौड रस्ता, फर्गसन रोड, डेक्कन, अलका चौक, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, हडपसर रस्ता, शिवाजी रस्ता, संचेती चौक परिसर, पुणे विद्यापीठ रस्ता यासह अन्य भागांत रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आणि झाडाच्या फांद्या पडल्यामुळे वाहतूक संथ, तर काही भागांत वाहतूक कोंडी झाली होती.
लोहगाव येथे सर्वाधिक 58 मिमी पाऊस
शहराच्या पूर्व भागातील लोहगाव, वडगावशेरी, चंदनगर, खराडी, मगरपट्टा भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये अनेक वर्षांनी मे महिन्याच्या अवकाळी पावसात सर्वाधिक पावसाची नोंद लोहगाव येथे झाली. तासभर पडलेल्या पावसाची 58 मिमी नोंद झाली आहे.
त्यापाठोपाठ वडगावशेरी येथे 37.5 मिमी पाऊस झाला. शिवाजीनगर परिसरातही सर्वाधिक 28, तर चिंचवड परिसरात 26 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, कात्रज, वारजे, धायरी, आंबेगाव, एनडीए, पाषाण, औंध, सातारा रोड व सिंहगड रोड या भागांत जोरदार पाऊस झाला.
कात्रज, धनकवडीत मुसळधार…
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार दक्षिण पुणे उपनगर भागात दुपारी वादळी वाऱ्यांसह विजाच्या कडकडाटात गारांच्या पावसाने हजेरी लावत झोडपले. सकाळपासूनच ढगांची गर्दी आकाशात होऊन उकाडा वाढला होता. दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने मुसळधार बरसत सर्व परिसरामध्ये पाणीच पाणी केले.
यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.कात्रज, धनकवडी, आंबेगाव पठार, सुखसागर नगर,दत्तनगर, भारती विद्यापीठ,संतोष नगर, गोकुळ नगर, जांभूळवाडी,कोळेवाडी,भिलारेवाडी,गुजर निंबाळकरवाडी,
सह अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. तसा दीड तासाच्या पावसामुळे कात्रज धनकवडी व परिसरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही रस्त्यावर पाणी जा साचले होते. तब्बलतास दीड दोन तास जोराचा मुसळधार पाऊस असल्याने बाहेर पडलेल्या नागरिकांनी आडोसेला थांबणे पसंत केले होते. मात्र या मुसळधार पावसाने दक्षिण होणे परिसरामध्ये उकड्यापासून थोड्या काळापुरता का होईना गारवा निर्माण झाला. यामुळे परिसरात थंड वातावरण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
शहरात झालेला पाऊस (मिमीमध्ये)
लोहगाव – 58
वडगावशेरी – 38
शिवाजीनगर – 28
चिंचवड – 26
मगरपट्टा – 13
एनडीए – 12
पाषाण – 11
नारायणगाव – 10
निमगिरी – 6
कोरेगाव पार्क आणि बालेवाडी – 5
हडपसर – 3




