माऊलींच्या द्वारी, स्वच्छता वारी कामिका एकादशीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने राबवला उपक्रम

नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा शहरात कामिका एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘माऊलींच्या द्वारी, स्वच्छता वारी’ उपक्रम राबवीत ज्ञानेश्वर मंदिर परिसर व रस्ता स्वच्छ करत तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली. कामिका एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रचंड भाविक आले होते. रस्त्यावर मोठी यात्रा भरली होती. मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. तो कचरा साफ करण्यासाठी मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून हे अभियान राबविले जात आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ शहरातील संत तुकाराम महाराज मंदिरापासून करण्यात आला. या स्वच्छता अभियानात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, नगरपंचायतचे कर्मचारी, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते. या अभियानाचा समारोप मंदिर प्रांगणात करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के हे होते.
यावेळी बोलताना देविदास महाराज म्हस्के म्हणाले, “या स्वच्छता वारीत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व गावकरी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत.माऊली ज्ञानेश्वरांनी अज्ञानरुपी कचरा साफ करण्याचे काम केले. तसे आपण त्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊली आहात. श्री ज्ञानेश्वर महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी केलेले स्वच्छतेचे काम खऱ्या अर्थाने खूप मोठे काम आहे.” मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, अॅड.काकासाहेब गायके, अॅड.सतीश पालवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी निवेदन केले. तर उपप्राचार्य प्रा.राधाताई मोटे यांनी आभार मानले. यावेळी नेहल गडाख, साक्षी गडाख, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, विश्वस्त कैलास जाधव, जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे, सतीश पिंपळे, रामकृष्ण कांगुणे जितेंद्र कुऱ्हे, नारायण लोखंडे उपस्थित होते.





