कोल्हापूरातही भरधाव चारचाकीचा थरार ! माजी कुलगुरूंच्या वाहनाची दुचाकींना धडक; ३ जणांचा मृत्यू

Kolhapur Accident – पुण्यातील पोर्शे कार अपघातामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर आज, सोमवारी कोल्हापुरात घडलेल्या एका अपघातामुळे थरकाप उडाला आहे.
कोल्हापुरातील सायबर चौकात एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकींना धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात नेहमी गजबजाट असलेल्या सायबर चौकात आज सोमवारी दुपारी अचानक एका भरधाव चारचाकी वाहनाने सहा ते सात दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ज्या दुचाकीस्वारांना धडक बसली त्यावरील लोक दुसऱ्या दुचाकीवर जाऊन धडकले.
या अपघातात तीन जणांनी जागीच जीव गमावला असून चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कोल्हापूर अपघातात जखमी झालेल्या लोकांना सीपीआर आणि सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या वाहनाने दुचाकींना धडक दिली ते वाहन शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत चव्हाण यांचाही मृत्यू झाला आहे. गाडी चालवताना चव्हाण यांना चक्कर आली आणि त्याचवेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अशी माहिती देण्यात आली आहे.
या अपघातानंतर आता पोलिसांकडून कारचालक, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





