राज्यसभेतून आणखी तीन खासदार निलंबित, एकूण संख्या पोहोचली 23 वर; विरोधक संतप्त
Updated On:

नवी दिल्ली – राज्यसभेत खासदार निलंबनाचे सत्र गुरूवारीही कायम राहिले. सुशीलकुमार गुप्ता, संदीपकुमार पाठक (दोघेही आप) आणि अपक्ष अजितकुमार भुयान या आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे चालू आठवड्यातील उर्वरित कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही.
अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत फलक घेऊन दाखल झाल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल ती कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर अयोग्य वर्तनाचा ठपका ठेवण्यात आला. आतापर्यंत विरोधी पक्षांच्या राज्यसभेतील तब्बल 23 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्या कारवाईमुळे विरोधक आणखी संतप्त झाले आहेत. त्यातून संसद अधिवेशनाच्या उर्वरित काळातही कामकाज सुरळितपणे चालण्याची शक्यता आणखी धूसर बनू लागली आहे.





