Solapur Accident : करमाळ्यात कार-दुचाकी अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोककळा

Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. इनोव्हा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शोककळा पसरली आहे.
हा अपघात करमाळा तालुक्यातील वीट गावाजवळ घडला. मोटारसायकलवर असलेले हनुमंत केरु फलफले (वय 35, रा. अंजनडोह, ता. करमाळा), कांचन केरु फलफले (वय 30, रा. अंजनडोह, ता. करमाळा) आणि स्वाती शरद काशीद (वय 25, रा. सराफवाडी, ता. इंदापूर) यांचा या अपघातात करुण अंत झाला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघात कशामुळे झाला आणि यामागे कोणाची चूक होती, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असली, तरी तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.
या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि दुखाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





