Satara News : रानडुकराच्या शिकारप्रकरणी पाटणमध्ये तीन जण ताब्यात

महाबळेश्वर : पाटण येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना वन विभागाने ताब्यात घेतले. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून पाटण येथे आणले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
या गुन्ह्यातील संशयित नारायण शिवाजी पवार (वय ४५), उत्तम रामू पवार (वय ६० दोघे रा. म्हावशी ता. पाटण, जि. सातारा), पंढरीनाथ यशवंत पाटील (वय ५४, रा. येरफळे ता. पाटण) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साताऱ्याच्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, वनपाल नीलेश कुंभार, वनरक्षक निखिल कदम, मोरगिरीचे वनरक्षक रोहित लोहार, पाचगणीचे वनरक्षक विलास वाघमारे, बहुलेचे वनरक्षक मेघराज नवले, गोवारेचे वनरक्षक राम मोटे, वनमजूर संजय जाधव यांनी ही कार्यवाही केली.

