“ते’ नगरसेवक नेमके कोणाचे?

समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केलेल्या कॉंग्रेसच्या सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक आज (दि.6) पुन्हा युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासोबत कार्यक्रमांत दिसले. त्यामुळे “ते’ नगरसेवक नेमके कोणाचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कॉंग्रेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्याविरोधात बंड पुकारत कॉंग्रेसच्याच सहा नगरसेवकांनी त्यांना अपात्र ठरविण्यासाठी व्यूहरचना आखली. कॉंग्रेसच्या त्या सहा नगरसेवकांनी मंगळवारी (दि.3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या नगरसेवकांची कॉंग्रेसशी नाळ तुटणार अशी अपेक्षा होती. परंतु, ती अपेक्षा फोल ठरली.
युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणच्या दौऱ्यावर होते. तांबे यांनी या दौऱ्यात निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज (दि.6) सकाळी त्यांनी तालुक्यात गाठीभेटी घेतल्या. यावेळी नगरपालिकेतील गटनेते व नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले गणेश बाबासाहेब भोस, स्वीकृत नगरसेवक समीर बोरा हे तांबे यांच्यासोबत होते. नगरसेविका सीमा गोरे यांचे पती प्रशांत गोरे हेही एका कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले नगरसेवक पुन्हा कॉंग्रेस नेत्यासोबत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या नगरसेवकांचा शिंदे गटातील प्रवेश हा निव्वळ तांत्रिक बाब आहे की काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे “ते’ नगरसेवक नेमके कोणाचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सत्यजीत तांबे व आम्ही मित्र आहोत. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तो पक्षाचा कार्यक्रम होता की नाही याबाबत मला कल्पना नाही.
– गणेश भोस, गटनेते, शिंदे गट





