करोनाच्या संसर्गाची तीन नवीन लक्षणे

वॉशिंग्टन – अमेरिकेतील “सेंटर फॉर डीसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन’ अर्थात “सीडीसी’ने करोनाच्या संसर्गाच्या आणखी तीन लक्षणांना मान्यता दिली आहे. नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक, मळमळ होणे आणि अतिसार या तीन लक्षणांच्या आधारे आता करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे निदान करता येऊ शकणार आहे.
करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे ओळखण्यासाठी यापूर्वी ताप, थंडी वाजणे, खोकला, श्वास अधिक काळ न टिकणे, श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा येणे, अंगदुखी, डोकेदुखी, वास किंवा चव न समजणे आणि घसा खवखवणे ही प्रमुख लक्षणे मानली जात होती. मात्र लक्षणांच्या या यादीमध्ये सर्व संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. अनेक प्रौढ कोविड-19 रुग्णांचे निरीक्षण केल्यावर लक्षणांच्या या यादीमध्ये आणखीन भर घातली जात आहे, असे “सीडीसी’ने म्हटले आहे.
“सीडीसी’ने ही नवीन लक्षणे 13 मे रोजीच गुपचूपपणे स्वीकारली आहेत. एप्रिलमध्ये “सीडीसी’ने लक्षणांच्या यादीमध्ये 6 नवीन लक्षणे समाविष्टही केली आहेत.
चीनमध्ये करोना विषाणू जेंव्हा सर्वप्रथम सापडला, तेंव्हा ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही संसर्गाची केवळ तीनच प्रमुख लक्षणे मानली जात होती. मात्र सौम्य ते तीव्र संसर्गानुसार लक्षणांचे स्वरुप बदलते असू शकते, असे संशोधकांचे मत आहे.
सौम्य लक्षणे असलेले रुग्ण 14 दिवसात बरे होतात. तर तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. त्यांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरचीही गरज भासू शकते. जगभरात आतापर्यंत 5 लाख जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
संसर्गाबरोबर वाढलेले वय, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब असलेल्या रुग्णांना करोनाच्या संसर्गाचा अधिक धोका संभवतो. याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये रुग्णास वारंवार झटपट श्वास घ्यावा लागणे, सातत्याने दुखणे, जागे राहणे अवघड होणे, ओठ निळे पडणे हे देखील आहे. जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्या रुग्णास तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे, असे समजावे, असे “सीडीसी’ने म्हटले आहे.





