BJP National President : ठरलं तर..! भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘या’ तिघांची नावं चर्चेत, कधी होणार घोषणा?

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर केले जाणार असल्याची
माहिती प्राप्त झाली आहे. भाजपने राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या मार्गातील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. अशात राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केली जावू शकते.
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, मिझोरम, पुडुचेरी, अंदमान निकोबार, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये लवकरच अध्यक्ष निवडला जाणार आहे. थोडक्यात, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५०% अध्यक्षांचा कोरम भाजपने पूर्ण केला आहे.
भाजपने संपूर्ण देशाला एकूण ३७ विभागात वाटले आहे. यातील २० राज्यांत अध्यक्षांची निवड झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यांच्या अध्यक्षांची निवड अद्याप व्हायची आहे. याची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. तरीसुध्दा, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्याची अट पूर्ण केली आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत जे नेते आघाडीवर आहेत त्यात केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे.
तिघेही मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि यांच्यापैकी जो कुणी अध्यक्ष होईल त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल. यामुळे मंत्रिमंडळातही फेरबदल होणे नक्की आहे. हे तिघेही नेते आरएसएस पार्श्वभूमीचे आहेत आणि सर्वांना संघटनेत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. मनोहर लाल खट्टर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी जवळच्या लोकांपैकी एक मानले जातात. अशात त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे.
मनोहर लाल खट्टर हे कोणत्याही जातीच्या समीकरणाच्या पलीकडे आहेत आणि त्यांची प्रतिमा कडक आणि प्रामाणिक नेत्याची मानली जाते. याशिवाय, आरएसएस देखील त्यांच्या नावावर सहमत होईल. तथापि, भूपेंद्र यादव देखील शर्यतीत मजबूत मानले जातात.
ते अमित शहा यांचे जवळचे मानले जातात आणि त्यांनी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये निवडणूक रणनीती हाताळली आहे. त्यांनाही भाजप आणि आरएसएसच्या संघटनेत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर अध्यक्षांबाबत काही निर्णय घेतला जाऊ शकतो.





