पुणे – महाराष्ट्रातील आमदारांसाठी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (एसओजी) बरोबर गव्हर्नन्स कोर्स लवकरच सुरू करणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे व नागपूर येथील विधानमंडळ येथे हा पाठ्यक्रम चालेल. तसेच तीन महिन्यांसाठी क्रॅश कोर्स आणि “एसओजी’च्या विद्यार्थ्यांसाठी विधानसभेत इंटर्नशीप देऊ, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंटच्या 19 व्या तुकडीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार सुस्मिता देव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व माजी आमदार उल्हास पवार, संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, मिटसॉगचे संचालक डॉ. के.गिरीसन, प्रा. परिमल माया सुधाकर आणि श्रीधर पब्बीशेट्टी उपस्थित होते. ऍड. राहुल नार्वेकर म्हणाले, राजकारणाचे गमक कळण्यासाठी विधानमंडळ व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये एक्सचेंज प्रोग्राम सुरू करू. राष्ट्राच्या प्रगतीसाठी व फायद्यासाठी हा पाठ्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात प्रवेश करावा. राष्ट्रभाव, दूरदृष्टी आणि भाषेवर नियंत्रण या सारखे गुण राजकारणात येताना अंगी बाळगावे. संघटनेला सोबत नेणाराच उत्तम नेता असतो. तसेच, उत्तम वक्ता असणेही गरजेचे आहे. राहुल कराड म्हणाले, शिक्षित राजकारणी युवकांमुळे देशात परिवर्तनाची लाट येईल. जाती व्यवस्था आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त ठेवण्यासाठी राजकारणात प्रशिक्षित राजकारणी लोकांची गरज आहे. काळानुसार देशात उत्तम पॉलिटिकल स्कूलची गरज आहे. या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत.