पुणे जिल्हा | चास येथे उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले

मंचर, (प्रतिनिधी) – चास (ता.आंबेगाव) येथे उसाची तोड सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. थोड्यावेळानंतर शेतातील बछडे मादी घेऊन गेली. अनेकांना दिवसाही या भागात बिबट्याचे दर्शन होत आहेत.
आता बछडेच आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील तोडकर मळा व शेगर मळ्याच्या सरहद्दीवर प्रताप गणपत फल्ले यांच्या मालकीच्या शेतात उसाची तोड सुरू होती.
तोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे तीन बछडे झोपलेले दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ऊसाच्या फडातून बाहेर निघाले. शेजारी राहणारे प्रल्हाद शेगर व बन्सी शेगर यांनी शेताकडे धाव घेतली. शेगर यांनी वनकर्मऱ्यांना बछडे मिळाल्याची माहिती दिली. त्यांनी रेक्यु टीम मेंबर काशिनाथ काळे यांना हा प्रकार कळविल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी बछडे पाहिले. वनपरिमंडल अधिकारी शशिकांत मडके व वनरक्षक रइस मोमीन यांना प्रकार कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यावेळी त्यांनी ऊसाच्या शेतात इतरत्र बछडे आढळून आले नाहीत. त्यामुळे मादीने बछडे नेल्याचे ठसे मिळून आले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे यांनी घटनास्थळी भेट दिली. मजूर शेतात येत नसल्याने उसाची तोड दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. नुकतेच जन्मलेले बछडे असावेत, असे नागरिकांनी सांगितले.





